Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 20:15 IST2025-06-08T20:14:59+5:302025-06-08T20:15:40+5:30
पुण्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या भुशी डॅम परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. धरणात पोहण्यास उतरलेल्या तरुणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला.

Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
पावसाला सुरूवात झाल्यानंतर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (८ जून) घडली. तरुणांचा ग्रुप धरणावर फिरायला गेला होता. धरणातील पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह झाला. यातच दोघांनी जीव गमावला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रविवारी सुट्टी असल्याने लोणावळ्यात राहणाऱ्या तरुणांचा ग्रुप भुशी डॅम परिसरात फिरायला गेला होता. धरण परिसरात फिरत असताना त्यांना पाणी पाहून पोहण्याचा मोह झाला. त्यामुळे सर्व मित्र धरणात उतरले.
पाण्यात उतरल्यानंतर पोहत होते. दोघे बरेच आतमध्ये गेले. त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि बुडाला लागले. इतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. पण, मदत मिळेपर्यंत दोघेही बुडाले होते.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा पोलीस, आपत्काली पथक आणि शिवदुर्ग टीम घटनास्थळी आली. त्यांनी पाण्यात शोध घेऊन दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.
बुडून मृत्यू झालेले दोन्ही तरुण मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. साहिल अश्रफ अली शेख आणि मोहम्मद जमाल अशी त्यांची नावे आहेत. दोघेही कामानिमित्त लोणावळ्यात राहत होते.
गडचिरोलीमध्ये ६ जणांचा बुडून मृत्यू
गडचिरोलीमध्येही सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर ७ जून रोजी सायंकाळी गोदावरी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या तेलंगणामधील 6 मुलांचा पाण्यात बुडून झालेला मृत्यू झाला. तब्बल 12 तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर सर्व मुलांचे मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले.