भोरच्या अविष्कार शिंदेची मरीन कमांडो म्हणून निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:04 IST2025-01-23T18:04:05+5:302025-01-23T18:04:05+5:30
मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन अविष्कार शिंदेने जिद्दीच्या जोरावर यश मिळविता येते हे दाखवून दिले

भोरच्या अविष्कार शिंदेची मरीन कमांडो म्हणून निवड
भोर : जिद्द व चिकाटी,मेहनतीच्या जोरावर अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण करुन भोलावडे (ता. भोर) येथील अविष्कार काळूराम शिंदे याची इंडियन नेव्ही मध्ये मरीन कमांडो म्हणून निवड झाली. भोर तालुक्यातील पहिला मरीन कमांडो ठरला आहे.
लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या अविष्कारने प्राथमिक शिक्षण १ ते ४ थी पर्यंत बारे ( ता. भोर) जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण भोर येथील जिजामाता विद्यालयात पूर्ण केले १२ वी सायन्स झाल्यावर अविष्कार शिंदेने मरीन कमांडो होण्याचे स्वप्न अथक प्रयत्नांनी पूर्ण केले आहे मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन गरुड भरारी घेणाऱ्या अविष्कार शिंदेने उराशी बाळगलेल्या स्वप्नाची पूर्ती करून जिद्दीच्या जोरावर यश मिळविता येते हे दाखवून दिले आहे.वडील काळूराम शिंदे माध्यमिक शिक्षक तसेच आई माया शिंदे पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागात कार्यरत आहेत.
अविष्कारने बारावी सायन्स नंतर मरीन कमांडोची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात २०२१ मध्ये पास होऊन गोवा आणी कोची येथे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. १३२ जणांची प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. मात्र अत्यंत कठीण असलेले हे प्रशिक्षण ५८ जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले समुद्रात जहाजावर जावे लागते,आतंकवादी हल्ला किंवा आपतकालीन परिस्थितीत आल्यावर सदैव तत्पर रहावे लागते. आपल्या जिद्दीला अभ्यासाची जोड देत संपूर्ण देशात अवघड समजल्या जाणाऱ्या इंडियन नेव्हीतील मरीन कमांडोची परीक्षा उत्तीर्ण होण्याची किमया केली आहे.परिसरातील नागरिक व मित्रमंडळींकडून त्याचे कौतुक होत आहे.