नसरापूर ग्रामपंचायतीच्या फर्निचरची माथेफिरूकडून फोडफोड; तरुणावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 14:19 IST2025-07-08T14:18:40+5:302025-07-08T14:19:15+5:30
- कार्यालयात गोंधळ घालण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला असून, त्या व्यक्तीवर राजगड पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

नसरापूर ग्रामपंचायतीच्या फर्निचरची माथेफिरूकडून फोडफोड; तरुणावर गुन्हा दाखल
नसरापूर : भोर तालुक्यातील सर्वात मोठ्या नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयात भरदुपारी घुसून एका माथेफिरू तरुणाने फर्निचरची तोडफोड करत ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सज्जड दम दिला. कार्यालयात गोंधळ घालण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला असून, त्या व्यक्तीवर राजगड पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
राजगड पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर असताना तालुक्याच्या दुय्यम भर बाजारपेठेतील स्थानिक स्वराज्य संस्था जर सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांनी कसे जगावे, असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याप्रकरणी नसरापूर (ता. भोर) ग्रामपंचायतीचे कर्मचारी रुपेश रविंद्र ओव्हाळ (वय ३९, रा. सिद्धार्थनगर, नसरापूर) यांनी मंगेश हनुमंत शिंदे (वय ४५, रा. नायगाव, ता. भोर) याच्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा निंदनीय प्रकार मंगळवारी (दि. ७ जुलै) दुपारी साडेबाराच्या सुमारास नसरापूर येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश शिंदे हा ग्रामपंचायत कार्यालयात येऊन “तुमचे ग्रामसेवक कोठे आहेत?” अशी विचारणा करू लागला. त्यावेळी फिर्यादी ओव्हाळ यांनी “ग्रामसेवक ससेवाडी येथे गेले आहेत,” असे सांगितल्यावर आरोपीने संतप्त होऊन ग्रामसेवक यांच्या टेबलवरील कागदपत्रे व काचेचा डेस्क फेकून फोडला. त्यानंतर लोखंडी पंचिंग मशीन डेस्कवर फेकून अधिक नुकसान केले.
तेव्हा कर्मचारी रुपेश ओव्हाळ यांनी “तू असे करू नकोस,” असे सांगितले असता, त्या तरुणाने त्यांना शिवीगाळ करत धमकी दिली, “इथे तुला काम करू देणार नाही.” या प्रकारामुळे कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, शासकीय कार्यालयांतील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित तरुणावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी उपसरपंच नामदेव चव्हाण, माजी उपसरपंच संदीप कदम, ग्रामपंचायत अधिकारी विजयकुमार कुलकर्णी आणि कर्मचारी रुपेश ओव्हाळ यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कडक कारवाई करण्याची मागणी
नसरापूर ग्रामपंचायतीमध्ये धुडगूस घालून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धमकी देत, सरकारी साहित्याची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी राजगड पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत पोलिसांकडे कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तोतया पत्रकाराचा प्रकार
घटना घडल्यानंतर मंगेश शिंदे यांनी स्वतःच्या मोबाईलवरून तक्रारदारास फोन करून “मी भोरहून पत्रकार अनिल जाधव बोलतोय. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत मला फिर्याद पाठवा,” असा खोटा पत्रकार असल्याचा दावा करत संवाद साधला.