Bhigwan Kidnap: भिगवणमधील अपहरण झालेली 'ती' तरुणी अखेर आली समोर, मध्यरात्री १.३० वाजता पोहोचली पोलीस ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 09:24 IST2026-02-20T09:21:28+5:302026-02-20T09:24:13+5:30
Bhigwan Kidnapping Case: भिगवणमधील तरुणीच्या अपहरणाचे प्रकरण वेगळेच असल्याचे समोर आले आहे. तरुणीने आपण स्वतःहून पळून गेल्याचे सांगितले आहे. इंदापूर पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. पण, ही तरुणी बारामती पोलीस ठाण्यात गेली.

Bhigwan Kidnap: भिगवणमधील अपहरण झालेली 'ती' तरुणी अखेर आली समोर, मध्यरात्री १.३० वाजता पोहोचली पोलीस ठाण्यात
पुणे जिल्ह्यात खळबळ माजवणाऱ्या भिगवण अपहरण प्रकरण एक बनाव असल्याचे उघड झाले आहे. आई-भावासोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेलेली असताना तरुणीचे दोघांनी अपहरण केल्याची तक्रार दिली गेली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हाही दाखल केला होता, पण तरुणीनेच एक व्हिडीओ जारी करत आपण स्वतःहून पळून आल्याचे सांगितले. ती तरुणी आणि तरुण कुठे आहेत, याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. ही तरुणी गुरुवारी मध्यरात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून आली. पोलीस तिला पोलीस ठाण्यातून सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले.
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला उचलून नेल्याची घटना मंगळवारी (१७ फेब्रुवारी) घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा पथके स्थापन केली होती. तिचा शोध सुरू असतानाच तरुणी गुरुवारी मध्यरात्री १.३० वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. हे प्रकरण संवेदनशील असल्याने तिला पोलीस तातडीने दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले.
९ वर्षांपासून जहीर शेखसोबत तरुणीचे प्रेमसंबंध
अपहरण झाल्याच्या प्रकरणाला धार्मिक रंगही राजकीय नेत्यांनी दिल्याने इंदापूर आणि भिगवणमध्ये तणाव वाढला होता. मात्र, तरुणीने तरुणासोबत एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तिने आपले अपहरण झालेले नसून, मी स्वमर्जीने पळून आले आहे, असे उघड केले.
त्याबरोबर जहीर शेख या तरुणासोबत आपले ९ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा खुलासाही या तरुणीने केला आहे. माझ्यावर कोणतीही जबरदस्ती करण्यात आली नाही. मी कोणाच्याही दबावाखाली नाही. मी स्वतःहून त्याच्यासोबत आली असल्याचे तरुणीने म्हटले आहे.
तरुण-तरुणीमध्ये पळून जाण्यापूर्वी मोबाईलवरून संभाषण
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार तरुण-तरुणीमध्ये प्रेमसंबंध असल्याचेच दिसत आहे. गेल्या दीड महिन्यामध्ये तरुणी आणि तरुण यांच्यात ११ वेळा संपर्क झाला होता. मुलीने स्वतःहून ८ वेळा तरुणाला मेसेज केलेले आहेत.
तरुणाने तरुणीला केलेले ३ कॉल्स हे मध्यरात्री उशिराचे आहेत. दोघे बोलण्यासाठी व्हॉट्सअपचा वापर करायचे. त्यामुळे पोलिसांनी आता त्यांच्या व्हॉट्सअप संभाषणाची माहितीही मागवली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकल्याचाही बनाव असल्याचे बोलले जात असून, वैद्यकीय अहवालानंतर ते अधिक स्पष्ट होणार आहे.