पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी पुण्याच्या नाक्यानाक्यावर भरतनाट्यम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 16:05 IST2019-03-16T16:03:50+5:302019-03-16T16:05:00+5:30
पुण्याच्या विविध भागांमध्ये भरतनाट्यम नृत्यातून पाणी बचतीचा संदेश देण्यात आला.

पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी पुण्याच्या नाक्यानाक्यावर भरतनाट्यम
पुणे : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी पुण्याच्या रस्ते ,चौक आणि प्रमुख ठिकाणी भरतनाट्यमद्वारे जनजागृती करणारा 'जल होश ' हा अभिनव उपक्रम १६ मार्च रोजी पुण्यातील नाक्यानाक्यावर आयोजित करण्यात आला होता. नृत्यपूजा एकेडमी तर्फे या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
होळी, धुळवडीचा सण २० मार्च रोजी असल्याने त्यापूर्वी ही जनजागृती पुणेकरांमध्ये केली, अशी माहिती एकेडमीच्या संचालक अनिता नेवे यांनी दिली. युवा कलाकारांद्वारे जनजागृतीपर भरतनाट्यम सादरीकरण केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,जंगलीमहाराज रस्ता,फर्गसन रस्ता ,कोथरूड ,शनिवारवाडा येथे शनिवारी सकाळी सादरीकरणे झाली. कुलगुरू नितीन करमाळकर यांनी कलाकारांची भेट घेऊन उपक्रमाचे स्वागत केले. पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले. त्यांनी पाणी बचतीचे आवाहन केले. कल्याणीनगर ,खराडी ,विमाननगर या ठिकाणी हे जनजागृतीपर भरतनाट्यम सादरीकरण रविवारी सकाळी होणार आहे .