मोबाईल टॉवर उभारण्याच्या आमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 15:38 IST2019-01-24T15:37:05+5:302019-01-24T15:38:21+5:30
मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जागा दिल्यास अडव्हान्स आणि दर महा भरमसाट भाडे देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून फसवणूक करण्याचे प्रकार वारंवार घडत आहे़

मोबाईल टॉवर उभारण्याच्या आमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक
पुणे : मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जागा दिल्यास अडव्हान्स आणि दर महा भरमसाट भाडे देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून फसवणूक करण्याचे प्रकार वारंवार घडत आहे़त. धनकवडीतील एकाला अशा प्रकारे पाच जणांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातील जागेवर टॉवर बसवून दरमहा भरमसाट भाडे देण्याचे आमिष दाखवून साडेआठ लाख रुपयांना गंडा घातला.
या प्रकरणी हनुमंत जगन्नाथ मोरे (वय ५१, रा़ केशवनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी अजय मिश्रा, आकाश अग्रवाल, रविकुमार अशी नावे सांगणारे तिघे व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे़. हा प्रकार १३ मे ते १५ नोव्हेंबर २०१८ दरम्यान घडला़. हनुमंत मोरे यांना आरोपींनी आपण गॅलेक्सी टॉवर ग्रुप प्रा़ लि़ या कंपनीमध्ये वेगवेगळ्या पदावर असल्याचे भासविले़. त्यांना मोबाईल व ई मेलद्वारे संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला़. त्यांच्या सांगली जिल्ह्यातील अमरापूर येथील जमिनीच्या प्लॅटवर गॅलेक्सी टॉवर ग्रुपच्या मार्फत व्होडाफोन कंपनीचा टॉवर बसवून देण्यासाठी ९० लाख रुपये अॅडव्हास व दर महा भाडे म्हणून ८५ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले़.
त्यानंतर त्यांना वेगवेगळी कारणे सांगून वेगवेगळ्या खात्यात पैसे भरायला लावले़. इतके पैसे मिळणार असल्याच्या हव्यासापोटी त्यांनी आरोपी सांगतील त्याप्रमाणे पैसे भरत गेले़. नोव्हेंबर २०१८ पर्यंत त्यांनी एकूण ८ लाख ५० हजार ७०० रुपये भरले़ .त्यानंतर आरोपींनी संपर्क साधणे बंद केल्यावर त्यांना संशय आला़ .तेव्हा त्यांची चौकशी केल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली़.