बारामती : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी होत आहे. याच दरम्यान आता आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची केवळ बीड पुरतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीची अपरिमित हानी होऊ शकते, असे वक्तव्य केले आहे.फलटण दाैऱ्यावर निघालेल्या आमदार सुरेश धस यांनी शनिवारी (दि. १) बारामतीत पत्रकारांसमवेत बोलताना हे वक्तव्य केले आहे. धस म्हणाले, अजित पवारांच्या भोवती जो कोंडावळा आहे. तो त्यांना योग्य सल्ला देत नाहीत. ते त्यांना अयोग्य सल्ला देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाची अपरिमित हानी या प्रकरणामुळे होणार असल्याचे धस म्हणाले.
बीडमध्ये दिवसाढवळ्या माणसं मारल्यानंतर बीडकडे सर्वांचे लक्ष लागणारच, बीडमध्ये सर्वत्रच असमतोलता निर्माण करून ठेवली आहे. आम्ही वारंवार सांगत आहोत की, बिंदुनामावली प्रमाणे कर्मचारी आणा. या ठिकाणी दोन टक्के कर्मचाऱ्यांच्या जागेवर थेट सातशे कर्मचारी झाल्यावर कसं होणार असा सवालही धस यांनी यावेळी व्यक्त केला.