कॉसमॉस फुलांचे 'सौंदर्य' पर्यावरणासाठी ठरतेय घातक; स्थानिक गवतांचे होतेय 'मरण'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 16:47 IST2020-10-31T16:47:23+5:302020-10-31T16:47:55+5:30
सौंदर्याला भुलू नये, समूळ नष्ट करावे

कॉसमॉस फुलांचे 'सौंदर्य' पर्यावरणासाठी ठरतेय घातक; स्थानिक गवतांचे होतेय 'मरण'
श्रीकिशन काळे-
पुणे : तळजाई टेकडीवर आणि शहरात अनेक ठिकाणी पिवळ्या फुलांना बहर आला आहे, त्याचे सौंदर्य पाहून नागरिक त्यासोबत फोटो देखील काढत आहेत. पण ते 'सौंदर्य' पर्यावरणासाठी घातक असून, त्याला 'कॉसमॉस' असे नाव आहे. ते परदेशी तण असून, स्थानिक गवत त्यामुळे नष्ट होत आहे. जे आपल्या गुरांचे खाद्य आहे. या 'कॉसमॉस'मुळे ते खाद्य कमी होत आहे.
परदेशी तण 'कॉसमॉस' यावर प्राणी, पक्ष्यांना उपजिविका करता येत नाही. हे तण गुरांना आवश्यक असणारे स्थानिक गवत नष्ट करून वाढत आहे. केवळ फुले चांगली दिसतात. लोकांना त्याचा उपयोग किंवा इतर माहिती नाही. सध्या शेताच्या बांधावर देखील ते येत आहे. परिणामी जैवसाखळी नष्ट होत आहे. मेंढरे, गाय, बैल, शेळ्या यांसाठी जे गवत लागते, ते कमी होत असल्याने त्यांना इतरत्र फिरावे लागत आहे. ह्यकॉसमॉसह्ण बाबत शेतकरी, नागरिक यांच्यात जनजागृती करायला हवी. हे तण काढून टाकण्यासाठी चळवळ उभी राहिली पाहिजे, अशी माहिती वनस्पतीतज्ज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी दिली. सध्या वृक्षारोपणाची चळवळ आहे, तशी तण काढण्याची सुरू व्हावी. समुळ उच्चाटन करण्यासाठी गावांमधील जैवविविधता समित्यांना, नागरिकांना याबाबत सांगायला हवे. लोकसहभाग घेतला तरच हे आगंतुक तण नष्ट होईल.
मधमाशांच्या मधावर व्हावे संशोधन
पूर्वी या कॉसमॉस फुलांवर किटक बसत नव्हते. पण इतर काहीच पर्याय नसल्याने इप्सिफोरिया ही मधमाशांची स्थानिक जात त्यावर आता बसू लागली आहे. त्यातील परागकण घेऊन ते मध तयार करीत आहेत. तो मध खाल्ला तर त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होईल, त्याबाबत संशोधन करणे आवश्यक आहे. एकूणच हे कॉसमॉस तण नुकसानकारक आहे.