The battle of 'Koregaon Bhima' was not for equality - Adv. Shivaji Konkene | ‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे 

‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे 

ठळक मुद्देकोकणे यांनी लिहिलेल्या ‘कोरेगाव (भीमा) शौर्य दिवस - सत्य की विपर्यास’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

पुणे :  ‘कोरेगाव भीमा’ येथे 1 जानेवारी 1818 रोजी झालेली लढाई ही पेशवे विरुद्ध एका विशिष्ट जाती समुहामध्ये झालेली नव्हती. तसे कोणतेही पुरावे इंग्रजांच्या तत्कालीन नोंदींमध्ये नाहीत. महाराष्ट्र, गुजरातसह बराच मोठा भाग इंग्रजांच्या गुलामगिरीत ढकलणारी ही घटना शौर्य दिन म्हणून साजरी करणे गैर आहे. ही समतेची लढाई नव्हती. गुलामगिरीतून मुक्तीसाठी एका जाती समुहाने 28 हजार पेशवे सैनिकांना कापले हा इतिहास खोटा असल्याचा खळबळजनक दावा अ‍ॅड. शिवाजी कोकणे यांनी केला आहे.

कोकणे यांनी लिहिलेल्या ‘कोरेगाव (भीमा) शौर्य दिवस - सत्य की विपर्यास’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जयस्तंभाचे परंपरागत व्यवस्थापक कॅप्टन (नि.) बाळासाहेब जमादार-माळवदकर, अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे माजी अध्यक्ष दीपक बलसूरकर, समाजवादी कवयित्री सरिता कुरुंदवाडे, राजेंद्र भोसले उपस्थित होते. यावेळी कोकणे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीमुळे याविषयाची चर्चा अधिक झाली. त्यामुळे मी या विषयाचा अभ्यास करण्याचे ठरविले. तीन वर्षांच्या अभ्यासानंतर हे पुस्तक लिहिले असून इंग्रजांचे अभिलेख, संदर्भ साहित्य, पत्रव्यवहार आदींचा अभ्यास केला आहे. जर ही लढाई समानतेची होती; तर लढाईनंतर समानता आली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

इंग्रज अधिका-यांनी वरिष्ठ अधिका-यांकडे लढाईबाबत दिलेल्या तपशिलामध्ये एका जाती समुहाचा किंवा तशा आशयाचा उल्लेख नाही. या लढाईत लढलेल्या तीन तुकड्यांपैकी इंग्रजांच्या घोडदळाच्या तुकडीचा लिखित इतिहास उपलब्ध आहे. त्यामध्येही कोणताही उल्लेख नाही. गौतम बुद्धांपासून आजवर समतेसाठी झालेल्या लढाया या अहिंसेच्या मार्गाने झाल्या आहेत. प्रबोधनामधून परिवर्तन असा त्यांचा सूर होता. परंतु, कोरेगाव भीमा येथे हिंसात्मक लढाई केली गेली हा इतिहास खोटा असल्याचे कोकणे म्हणाले.

माळवदकर म्हणाले, 1 जानेवारी 1818 ची लढाई ही ‘डिफेन्स वॉर’ होती. 1822 मध्ये याठिकाणी जयस्तंभ उभारण्यात आला. या लढाईत शहीद झालेल्या, जखमी झालेल्यांची नावे लिहिण्यात आलेली आहेत. या लढाईत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या खंडोजी जमादार-माळवदकर यांचा मी सहावा वंशज आहे. त्यांना ब्रिटीशांनी जयस्तंभाचा प्रमुख म्हणून नेमले होते. जमिनही दिली होती. या ठिकाणी धार्मिक कृती करु देऊ नका. तशी कृती घडल्यास जमादार आणि जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आदेश इंग्रजांनी आम्हाला दिलेले होते. तरीसुद्धा याठिकाणी दरवर्षी शौर्यदिवस साजरा केला जातो. कोणत्याही जातीशी या लढाईचा संबंध नाही. इंग्रजांनी हा जयस्तंभ का उभारला याची माहितीच लोकांना नसल्याचे माळवदकर म्हणाले.

मी पक्का समाजवादी
मी पक्का समाजवादी आहे. दंगलीनंतर मला या विषयावर अभ्यास करण्याची इच्छा निर्माण झाली. तीन वर्षांच्या परिश्रमानंतर पुस्तक तयार झाले आहे. विषय वादग्रस्त असल्याने कोणीही प्रस्तावना लिहिण्यास किंवा प्रकाशक मिळेना. शेवटी मीच पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाला प्रस्तावना नाही. मला पुढील पाच-दहा वर्षे संघर्षाचा सामना करावा लागणार आहे. परंतु, जे सत्य आहे ते मांडले पाहिजे. लोकशाहीमध्ये सर्वांना मते मांडण्याचा अधिकार आहे.
- अ‍ॅड. शिवाजी कोकणे, लेखक

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The battle of 'Koregaon Bhima' was not for equality - Adv. Shivaji Konkene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.