अस्वस्थेतेतच विरला ‘अजितदादां’च्या उपमुख्यमंत्री पदाचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 13:39 IST2019-11-23T13:35:02+5:302019-11-23T13:39:45+5:30
राज्यात शनिवारी (दि २३) भल्या सकाळीच झालेल्या राजकीय भुकंपाचे राष्ट्रवादीच्या माहेरघरी बारामतीत तीव्र पडसाद उमटले. राजकीय घडामोंडींपेक्षा बारामतीची ओळख असणाऱ्या पवार कुटुंबियांमध्ये फुट पडल्याचे समजताच येथील नागरीकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थेतेतच ‘अजितदादां’ना उपमुख्यमंत्री पद मिळाल्याचा आनंद विरुन गेल्याचे चित्र होते.

अस्वस्थेतेतच विरला ‘अजितदादां’च्या उपमुख्यमंत्री पदाचा आनंद
पुणे (बारामती ) : राज्यात शनिवारी (दि २३) भल्या सकाळीच झालेल्या राजकीय भुकंपाचे राष्ट्रवादीच्या माहेरघरी बारामतीत तीव्र पडसाद उमटले. राजकीय घडामोंडींपेक्षा बारामतीची ओळख असणाऱ्या पवार कुटुंबियांमध्ये फुट पडल्याचे समजताच येथील नागरीकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थेतेतच ‘अजितदादां’ना उपमुख्यमंत्री पद मिळाल्याचा आनंद विरुन गेल्याचे चित्र होते.
आज सकाळी देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री म्हणुन, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतली. त्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप समवेत जाण्याचा अजित पवार यांचा निर्णय वैयक्तिक आहे,यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नसल्याचे जाहीर केले. तसेच दुपारी १२ च्या दरम्यान अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेते पदावरुन हकालपट्टी झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर बारामतीत शांतता पसरली.यावेळी उपमुख्यमंत्री पद मिळाल्याचा आनंदापेक्षा ही शांतता अधिक ठळकपणे जाणवली.
दरम्यान, अजित पवार यांच्या शहरातील सहयोग निवासस्थानी पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शहरात देखील पोलीस बंदोबस्त ठेवल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या काही समर्थकांनी बारामतीत फटाक़े वाजवले.मात्र, अपेक्षित गर्दी,तो जल्लोष दिसलाच नाही.
...आम्ही पुन्हा आलोय
बारामतीत राष्ट्रवादीच्या गोटात शांतता पसरली असली तरी भाजपमध्ये गटामध्ये जल्लोषाचे वातावरण होते. भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची
आताषबाजी करुन आनंद व्यक्त केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ‘कोण आला रे कोण आला, नागपुरचा वाघ आला, आम्ही पुन्हा आलोय ,आम्ही पुन्हा आलोय,अशी जोरदार घोषणाबाजी केली.
पवार कुटुंबात फुट
राजकीय घडामोडींच्या सुरवातील अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विश्वासात घेवुन भाजप पाठींब्याबाबत निर्णय घेतल्याचा
बारामतीकरांचा अंदाज होता.मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्रकारपरिषदेनंतर हा राजकीय भुकंपाचा नागरीकांना अंदाज आला. तसेच खासदारसुप्रिया सुळे यांनी ‘पक्ष आणि कुटुुंबात फुट’ असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवले आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांमध्ये फुट पडल्याचे नागरीकांच्या लक्षात आले.