'गणराया बंडखोर आमदारांना सदबुद्धी दे', बारामतीच्या शिवसैनिकांचे उध्दव ठाकरेंना समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 18:29 IST2022-06-27T18:29:06+5:302022-06-27T18:29:37+5:30
बारामती तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने ढोल वाजवत मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

'गणराया बंडखोर आमदारांना सदबुद्धी दे', बारामतीच्या शिवसैनिकांचे उध्दव ठाकरेंना समर्थन
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे माहेर घर असणाऱ्या बारामतीच्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना समर्थन देण्याची भुमिका घेतली आहे. सोमवारी(दि २७) येथील भिगवण चौकात सकाळी बारामती तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने ढोल वाजवत मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला. तसेच शहराच्या मध्यवर्ती असलेल्या भिगवण चौकात शिवसेनेच्या वतीने बंडखोरी केलेल्या आमदारांना सदबुद्धी देवो व शिवसेनेवर आलेले संकट टळो अशी प्रार्थना करीत गणरायाला साकडे घालण्यात आले. बंडखोर स्वगृही परत यावेत यासाठी आरती करण्यात आली.
यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अॅड. राजेंद्र काळे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष विश्वास मांढरे, भीमराव भोसले, शहर प्रमुख पप्पू माने, युवा सेना तालुकाध्यक्ष निखील देवकाते, युवा सेना शहराध्यक्ष गणेश करंजे, दिग्विजय जगताप,भारत जाधव आदी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.