पुणे : बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मी काम करत राहणार आहे. शहरात बेकायदेशीर व जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या कोणत्याही गोष्टींना थारा दिला जाणार नाही. दादांनी सुरू केलेले सर्व विकासकामे पूर्णत्वास नेण्याचा माझा निर्धार असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा सर्वपक्षीय कार्यकर्ता मेळावा कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, दोन महिन्यांपूर्वी आपण सर्वांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, लोकनेते, आदरणीय अजितदादांना गमावले, ही केवळ माझ्या कुटुंबाची नाही, तर संपूर्ण बारामतीची मोठी हानी आहे. दादांचे जाणे बारामतीकरांना पोरके करून गेले. त्यांच्या अनुपस्थितीत ही पहिलीच निवडणूक होत असून त्यांच्या विकासदृष्टीला पुढे नेण्यासाठी आपली साथ अत्यंत आवश्यक आहे. बारामती शहर हे जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे दादांचे स्वप्न होते. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, मात्र त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिकपणे काम करणे ही, आपली सर्वांची जबाबदारी आहे. संपूर्ण बारामती हे माझे कुटुंब आहे, अशा भावना मेळाव्यात व्यक्त केल्या.
दादांचा जनता दरबार जसा सर्वांसाठी खुला होता, तसाच तो पुढेही कायम ठेवत प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मी काम करत राहणार. शहरात बेकायदेशीर व जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या कोणत्याही गोष्टींना थारा दिला जाणार नाही. दादांनी सुरू केलेले सर्व विकासकामे पूर्णत्वास नेण्याचा माझा निर्धार आहे, असे स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महायुतीतील सर्व नेत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दादांच्या आठवणींना साक्षी ठेवून त्यांच्या विचारांना अनुसरून सतत कार्यरत राहण्याचा माझा संकल्प आहे.
गेली अनेक वर्षे दादांनी ज्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या, त्याच समर्पणाने आता बारामतीसह महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी उचलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. ही निवडणूक माझी वैयक्तिक नसून दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक बारामतीकरांची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Web Summary : Sunetra Pawar pledged to continue Ajit Pawar's development work in Baramati. Addressing party workers, she emphasized her commitment to preventing illegal activities and fulfilling his vision for the city. She considers Baramati her family and will address their problems.
Web Summary : सुनेत्रा पवार ने बारामती में अजित पवार के विकास कार्यों को जारी रखने का संकल्प लिया। पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए, उन्होंने अवैध गतिविधियों को रोकने और शहर के लिए उनके दृष्टिकोण को पूरा करने की अपनी प्रतिबद्धता पर जोर दिया। बारामती को वह अपना परिवार मानती हैं और उनकी समस्याओं का समाधान करेंगी।