Baramati bypoll election: प्रचारसभेनंतर कन्हेरीतील सभेचे ठिकाण चकाचक; अजित पवारांच्या विचारांची जपणूक केल्याचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 18:33 IST2026-04-12T18:33:34+5:302026-04-12T18:33:42+5:30
baramati bypoll election - दिवंगत उपमुख्यमंत्री पवार यांना स्वच्छतेची आवड होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी साधा कागदाचा तुकडा पडलेला पाहिला तरी ते संयोजकांची खरडपट्टी काढत.

Baramati bypoll election: प्रचारसभेनंतर कन्हेरीतील सभेचे ठिकाण चकाचक; अजित पवारांच्या विचारांची जपणूक केल्याचा अनुभव
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्वच्छता आणि काटेकोरपणाची मोठी आवड होती. प्रत्येक परिसर हा स्वच्छ असायला हवा, सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता हवी, असा त्यांचा नेहमी आग्रह असे. मात्र, त्यांच्या पश्चात देखील त्यांच्या विचारांची जपणूक केल्याचे आजच्या कन्हेरी येथील प्रचारसभेच्या निमित्ताने बारामतीकरांनी अनुभवले.
दिवंगत उपमुख्यमंत्री पवार यांना स्वच्छतेची आवड होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी साधा कागदाचा तुकडा पडलेला पाहिला तरी ते संयोजकांची खरडपट्टी काढत. अनेकदा तो कागद स्वत: उचलून स्वत:च्या खिशात ठेवून दूर नेऊन टाकत. त्यांचा हा स्वभाव बारामतीकरांनी नेहमीच अनुभवला. दि. १२ रोजी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सभा पार पडल्यानंतर सभेच्या ठिकाणाची तातडीने स्वच्छता करण्यात आली. केवळ स्वच्छता करून स्थानिक थांबले नाहीत तर तातडीने हा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
कन्हेरी येथील सभेचा परिसर अवघ्या काही तासांत चकाचक करण्यात आला. त्यामुळे दिवंगत उपमुख्यमंत्री पवार हयात नसले तरी त्यांचा स्वच्छतेचा वारसा सर्वांनी जपल्याचे, जिवंत ठेवल्याचे यावेळी दिसून आले. बारामती शहरात देखील प्रत्येक आठवड्याला परिसरात श्रमदानातून स्वच्छतेचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. दादांनाही अपेक्षित काम केल्याचे कौतुक यावेळी उपस्थितांनी केले.