दौंड : दौंड शहरातील बांगलादेशी नागरिक शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या माजी उपनगराध्यक्षा हेमलता प्रवीण परदेशी यांनी तहसीलदार अरुण शेलार, पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देशाच्या चारही दिशांना जोडणारे दौंड रेल्वे स्टेशन जंक्शन आहे. दरम्यान, दौंड तालुक्यात विशेषत: दौंड शहरात बांगलादेशी घुसखोरी करून राहात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करणे देशाच्या आणि दौंड तालुक्याच्या हिताचे राहील. बांगलादेशात भारतीय नागरिकांवर विशेषतः हिंदूंवर मोठा अन्याय सुरू आहे. मात्र, बांगलादेशातील सरकार हिंदूंच्या अन्यायाविरोधात बांगलादेशातील समाजकंटकांवर कारवाई करण्यास कच खात आहे.दरम्यान, हिंदूंवरील अत्याचार वाढत आहेत, ही गंभीर बाब आहे. यासाठी भारताच्या परराष्ट्र धोरणाने योग्य ती काळजी घेऊन बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी योग्य तो पुढाकार घेतला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत भारतात बांगलादेशातील नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत आहेत. त्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे, अशीच शोधमोहीम दौंड तालुक्यात सुरू केली तर निश्चितच घुसखोर बांगलादेशी नागरिक सापडतील, असे शेवटी निवेदनात म्हटले आहे.