पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणातील गुन्ह्यातील १३ आरोपींपैकी ७ आरोपी हे १९ ते २५ वयोगटातील आहेत. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याने खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगली आहे. नुकत्याच तारुण्यात आलेल्या युवकांकडून संघटित गुन्हेगारीकरिता कट रचून गुन्हे करण्यात टोळीप्रमुख बंडू आंदेकर याचा हातखंडा आहे, असे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.
आंदेकर टोळीतील अटक केलेल्या १० आरोपींना सोमवारी मोक्का न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुष कोमकर याचा निर्घृणपणे खून केला होता. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला दोघांना अटक केली. त्यानंतर बंडू आंदेकरसह चौघांना बुलढाणा येथील मेहकर येथे अटक केली. पुण्यात दोघांना अटक केली होती. शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९) आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०, सर्व रा. नाना पेठ) यांना गुजरातमधील द्वारका येथे रविवारी पहाटे साडेतीन वाजता अटक केली होती. स्थानिक न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर त्यांना सोमवारी पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सरकार वकील विलास पठारे यांनी सांगितले की, आंदेकर टोळीप्रमुख बंडू आंदेकर ७० वर्षांचा असून, यातील ७ आरोपी हे १९ ते २५ वयोगटातील आहेत. बंडू आंदेकर याने या युवकांना संघटित गुन्हेगारीकरिता कट रचून त्यांच्याकडून १८ वर्षांच्या युवकाचा अमानवीयरीत्या निर्घृण खून केला आहे. यामध्ये हेतू व कट दोन महत्त्वाच्या मुद्यावर सखोल तपास करणे अत्यंत आवश्यक आहे. खून करताना अमन पठाण याच्या अंगावरील जाकीट, तसेच सुजल मेरगू याच्या अंगावरील स्वत:चे कपडे फेकून दिल्याचे सांगत आहे. ते पुराव्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे असून, त्यांच्याकडे सखोल तपास करायचा आहे. आरोपींच्या घराची झडती घेतली असून, त्यात प्राप्त मोबाइल, पेनड्राइव्ह, रोख रक्कम, दागदागिने, तसेच काही कागदपत्रे याबाबत त्यांना समक्ष विचारून तपास करायचा आहे, तसेच यातील फरार कृष्णा आंदेकर याचा शोध घ्यायचा आहे. गुन्ह्यात वापरलेली पिस्टल कोणी पुरवली, तसेच पिस्टल चालविण्याचा सराव कोठे केला, याचा तपास करायचा आहे. वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्याकरिता यापूर्वी किती वेळा प्रयत्न केला, तसेच आयुष कोमकर याच्यावर कोणाला निगराणी ठेवण्यास सांगितले होते, याचा तपास करायचा असल्याचे सांगितले. न्यायालयाने सर्वांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.