पीओपीची गणेशमूर्ती बनविणे किंवा विसर्जन करण्यावर बंदी; पुणे महापालिकेची नियमावली जाहीर
By राजू हिंगे | Updated: February 14, 2025 19:24 IST2025-02-14T19:24:00+5:302025-02-14T19:24:35+5:30
महापालिकेने तयार केलेल्या सुधारित नियमावलीत पीओपीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करणे यावर पूर्णपणे बंदी

पीओपीची गणेशमूर्ती बनविणे किंवा विसर्जन करण्यावर बंदी; पुणे महापालिकेची नियमावली जाहीर
पुणे : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनविण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यानुसार महापालिकेने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये पीओपीची मूर्ती बनविणे किंवा विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास पर्यावरण अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या मूर्तिकारांना आता शाडू मातीच्या मूर्ती बनवाव्या लागणार आहेत.
केंद्रीय पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे २०२० मध्ये गणेशमूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती. त्यास अनुसरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमावली जाहीर केली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेच्या ३० जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत विविध सण-उत्सावांदरम्यान सर्व महापालिका, सर्व जिल्हाधिकारी यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांतील कलम २ नुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करणे यावर पूर्णपणे बंदीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश अतिरिक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी काढले आहेत.
पालिकेने तयार केलेल्या सुधारित नियमावलीत पीओपीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करणे यावर पूर्णपणे बंदी असेल. महापालिका क्षेत्रात मूर्ती या नैसर्गिक, पर्यावरणपूरक जैवविघटक पदार्थांपासून कराव्यात. प्लास्टिक, थर्माकोल, पीओपीचा समावेश नसणाऱ्या मूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. रंग जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक असावेत, विषारी व अविघटनशील रासायनिक रंग, ऑइलपेंट्स, कृत्रिम रंग वापर करू नये. पूजेसाठी फुले, वस्त्र, पूजा साहित्य पर्यावरणपूरक असावे. मूर्तींचे दागिने बनविताना वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादीचा वापर करावा. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणाऱ्या मूर्तिकारांकडून, विक्रेत्यांकडून नागरिकांनी मूर्ती खरेदी करावी, या बाबींचा समावेश आहे.