Tasty Katta: पुण्यात १०० वर्षांपासून 'बाजीराव मस्तानी'; उन्हाळ्यात घ्या थंडाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 14:55 IST2023-04-19T14:54:58+5:302023-04-19T14:55:13+5:30
मस्तानी पाहून डोळे थंडावतात, प्यायला सुरुवात केली की, पोट थंडावते व ग्लास संपला की, डुलकी लागते

Tasty Katta: पुण्यात १०० वर्षांपासून 'बाजीराव मस्तानी'; उन्हाळ्यात घ्या थंडाई
राजू इनामदार
पुणे: आईस्क्रीमचे एखादे दुकान १०० वर्षांचे असू शकते का? पुण्यात नक्कीच असून शकते. गुजर कोल्ड्रिंक्स हाउस हे दगडूशेठ दत्त मंदिरासमोरच्या बोळातील आईस्क्रीमचे दुकान नुकतेच शंभरीत पदार्पण करते झाले. त्यांचे बाजीराव मस्तानी अप्रतिम शीतपेयही शंभरीचे झाले. बाबूराव गूजर यांनी सन १९२३ मध्ये सध्या आहे, त्याच जागेवर हे दुकान सुरू केले. आता त्यांची चौथी पिढी कार्यरत आहे. मस्तानीपासून सगळ्या आईस्क्रीम, सरबते वगैरे ते घरी तयार करतात. विश्वनाथ म्हणून एक जण दुकानात असतात. अरे मी तुझ्याएवढा होतो, त्यावेळी मला माझे वडील इथे घेऊन यायचे, असे दर १० ग्राहकांमागे एक जण तरी म्हणताना ऐकायला येतो.
स्वच्छ काचेचे ग्लास, काचेपेक्षाही स्वच्छ असे आईस्क्रीम काउंटर व या स्वच्छतेला साजेसे सुशोभित दुकान. बेल्जियमचे आरसे, जुनी चित्रे, जुन्याच जाहिराती, बसायलाही जुनीच लाकडी बाकडी असे या दुकानाचा अनोखा रंग आहे. दुकानात समोरच्याच बाजूला काचेच्या मोठ्या बाटल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सरबतांचा रस भरून ठेवलेला असतो. त्याच्याबरोबर खालील बाजूला वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीमची डबे असतात. त्यातून आईस्क्रीमचा गोळा काढून घेऊन तो मस्तानीत सोडताना किंवा आईस्क्रीमच्या खास ग्लासमध्ये सोडतानाचे कौशल्य पाहण्यासारखे असते.
बाजीराव मस्तानी हे यांचे खास उत्पादन आहे. गच्च भरलेला ग्लास, त्यावर आईस्क्रीमचा गोळा, त्याच्यावर मलई, त्यावर पुन्हा सुका मेवा हे सगळं पाहतानाही डोळे थंडावतात. प्यायला सुरुवात केली की, पोट थंडावते व ग्लास संपला की, डुलकी लागते की काय, असे वाटू लागते. प्रत्येक पुणेकराने हे अनुभवलेले आहेच, बाहेरून आलेल्यांनी मात्र किमान एकदा तरी जाऊन ही मजा घ्यावीच.
कुठे : दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोर
कधी : दिवसभर व रात्री उशिरापर्यंत
आणखी काय : वेगवेगळ्या प्रकारची थंड सरबतं, आईस्क्रीम, कुल्फी.