पुणे: पुणेरेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या बॅग तपासणीसाठी मुख्य प्रवेशद्वार येथे स्कॅनिंग लावले असले तरी, गेली कित्येक दिवस हे स्कॅनर मशीन बंदच आहे तसेच नव्याने पादचारी पुलावर दोन बॅग स्कॅनिंग मशीन बसविण्यात आले आहे परंतु येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे बॅग तपासणीकडे रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच आहे, असे दिसून आले.
मध्य रेल्वे विभागातील पुणे रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे विभाग आहे. पुण्यातून दैनंदिन दोनशेपेक्षा जास्त गाड्या धावत असून, जवळपास दीड लाखापेक्षा जास्त नागरिक प्रवास करतात. सध्या काही शाळांना सुटी लागल्याने रेल्वेला गर्दी वाढली आहे शिवाय पुणे रेल्वे स्थानकावरून उत्तरेत जाणाऱ्या गाड्यांना नेहमीच गर्दी असते. सोमवारी स्थानकावर प्रचंड गर्दी होती. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जाते. पण, त्या काही पुरेशा असल्याचे दिसत नाही.
पुणे रेल्वे स्थानकात दिवसाला लाखो प्रवासी येत असताना मुख्य प्रवेशद्वारावर असलेले बॅग स्कॅनिंग मशीन बंद आहे. काही दिवस हे मशीन सुरू होते. पण, ते नंतर बंद पडले. आता रेल्वे प्रशासनाकडून पादचारी पुलावर दोन्ही बाजूला नव्याने बॅग स्कॅनिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. पण, त्या बॅग स्कॅनिंग मशीनचा योग्य वापर होत नसल्याचे दिसून आले. प्रवासी बॅगा तपासण्याकडे रेल्वे सुरक्षा दलाचे लक्ष नसल्याचे दिसून आले.
सुरक्षा रक्षक गेले कुठे?
पुणे रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करण्यासाठी पाच ते सहा मार्ग आहेत. त्यापैकी एका मुख्य मार्गावर मेटल डिटेक्टर आहेत. इतर ठिकाणी मेटल डिटेक्टर नाहीत. त्यामुळे प्रवाशांची तपासणीच होत नाही. शिवाय उन्हाळी हंगाम सुरू झाल्यामुळे गर्दी वाढली आहे. या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाची (आरपीएफ) गस्त असते, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येते. परंतु सोमवारी दुपारी स्थानक परिसरात कोणीही दिसून आले नाही.
तिकिटासाठी रांगा
मुख्य इमारतीच्या आत आणि बाहेरील बाजूस तिकीट घेण्यासाठी प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उन्हाळी सुट्ट्यात पुण्याहून रेल्वेने बाहेरगावी प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. याची दक्षता घेऊन तिकीट विक्रीसाठी खिडक्या वाढविणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढते. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांसाठी बाहेर छत टाकण्यात यावे. स्कॅनर मशीन तत्काळ दुरुस्त करून लावावी, जेणेकरून प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडेल. - हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप