विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यांबाबत जनजागृती; काँग्रेसचे राज्यभर लवकरच मशाल मोर्चे
By राजू इनामदार | Updated: June 10, 2025 19:18 IST2025-06-10T19:18:42+5:302025-06-10T19:18:58+5:30
राहुल गांधींच्या आरोपांचे निराकरण निवडणूक आयोगाने करणे अपेक्षित असताना त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे

विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यांबाबत जनजागृती; काँग्रेसचे राज्यभर लवकरच मशाल मोर्चे
पुणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले. आता त्यावर जनजागृती करण्यासाठी काँग्रेसकडून १२ ते १४ जून दरम्यान राज्यभर मशाल मोर्चे काढण्यात येणार आहेत. प्रदेश शाखेकडून सर्व जिल्हा व शहर शाखांना त्याबाबत कळवण्यात आले आहे.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी ही माहिती दिली. राहुल गांधी यांनी मतदान प्रक्रियेत बराच मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी आयोगाकडूनच प्रसिद्ध करण्यात आलेली काही आकडेवारीही दिली होती. त्यांच्या आरोपांचे निराकरण निवडणूक आयोगाने करणे अपेक्षित असताना त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा अधिकार फडणवीस यांना कोणी दिला, आयोगावर केलेल्या आरोपांची मिरची फडणवीस यांना का लागली, असा प्रश्न जोशी यांनी केला.
फडणवीस यांनी दिलेले उत्तरही राज्यातील जनतेची दिशाभूल करणारे आहे. आधीच्या निवडणूक आयोगामध्ये देशाच्या सरन्यायाधीशांचा समावेश होता. पंतप्रधान, विरोधी पक्षाचा प्रतिनिधी व सरन्यायाधीश अशी ती रचना होती. कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र सरकारने सरन्यायाधीशांना वगळून त्या जागेवर केंद्रीय मंत्री अशी रचना केली व लगेचच तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नियुक्ती केली. याबाबत राहुल यांनी प्रश्न विचारला होता. फडणवीस यांनी आपल्या उत्तरात नेमकी या विषयाला बगल दिली आहे, अशी टीका जोशी यांनी केली. मशाल मोर्चांमधून काँग्रेस राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या अशा अनेक घोटाळ्यांबाबत जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.