केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाला विमान प्रशासनाचे दुर्लक्ष;एरोमॉल प्रशासनाच्या दबावामुळे ‘पीएमपी’ला जागा देण्यास टाळाटाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 13:47 IST2025-02-15T13:47:56+5:302025-02-15T13:47:56+5:30
पुणे : लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसला थांब्यासाठी जागा द्यावी, अशा सूचना केंद्रीय विमान वाहतूक ...

केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाला विमान प्रशासनाचे दुर्लक्ष;एरोमॉल प्रशासनाच्या दबावामुळे ‘पीएमपी’ला जागा देण्यास टाळाटाळ
पुणे : लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसला थांब्यासाठी जागा द्यावी, अशा सूचना केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्र्यांनी विमानतळ प्रशासनाला दिल्या आहेत. तरीही पीएमपी बसला नवीन टर्मिनलमध्ये जागा मिळालेली नाही. एरोमॉल प्रशासनाच्या दबावामुळे जागा देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे.
‘पीएमपी’कडून रामवाडी ते पुणे विमानतळदरम्यान बससेवा आहे; परंतु ही बस एरोमॉलच्या शेजारी नव्या टर्मिनलबाहेर थांबविली जाते. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणी येत आहेत. नव्या टर्मिनलमध्ये पीएमपीला जागा मिळावी, यासाठी पीएमपी प्रशासनाकडून विमानतळ प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्रदेखील पीएमपी प्रशासनाने विमातळ प्रशासनाला दिले आहे; परंतु विमानतळ प्रशासनकडून अद्याप तरी जागा मिळालेली नाही. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांनी विमानतळ प्रशासनाला ‘पीएमपी’ची बस आतमध्ये सोडण्यास परवानगी द्यावी, अशा सूचना दिल्या होत्या; पण त्यानंतर एक महिना झाला तरी पीएमपीला आतमध्ये जागा मिळालेली नाही. त्यामुळे विमानतळ प्रशासन मंत्र्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. मात्र, सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या पीएमपीला जागा मिळावी, यासाठी प्रवाशांकडून मागणी होत आहे.
प्रवाशांना दुहेरी त्रास
पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून प्रवासी रामवाडीपर्यंत मेट्रोतून रामवाडीपर्यंत येतात. पुढे पीएमपीकडून रामवाडी मेट्रो स्टेशन ते पुणे विमानतळ मार्गावर बससेवा सुरू केली आहे. ही बस एरोमॉलच्या शेजारी उभी करतात. नव्या टर्मिनलवरून येणाऱ्या प्रवाशांना लांब अंतर पडते. त्यामुळे ऑनलाइन कॅब बुक करतात. पीएमपी व मेट्रोतून ५० ते ६० रुपयांमध्ये होणाऱ्या प्रवासासाठी २०० ते ३०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक आणि मानसिक असा दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.
कॅब भरून, बस धावते रिकामी
विमान, मेट्रो प्रवाशांना ये-जासाठी सोयीचे व्हावी, यासाठी पीएमपीकडून फिडर सेवा सुरू करण्यात आली; परंतु प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही, असे वारंवार सांगितले जाते. मुळात पीएमपीला सोयीचे ठिकाण मिळाले तर प्रवाशांच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल; परंतु कोपऱ्यात बस उभी केल्यावर प्रवाशांना बस दिसत नाही. मात्र, दुसरीकडे खासगी कॅबला चांगला प्रतिसाद चांगला आहे. दैनंदिन पुणे विमानतळावरून ५०० च्या आसपास कॅब धावतात.