'Author Academy' in FTII | एफ़टीआयमध्ये स्थापन होणार ' लेखक अ‍ॅकॅडमी '  

एफ़टीआयमध्ये स्थापन होणार ' लेखक अ‍ॅकॅडमी '  

ठळक मुद्दे आशयघन चित्रपट, मालिका, नाटक निर्मितीसाठी लेखन विषयाला प्राधान्य दिले जाणार

पुणे: दर्जेदार संहिता असेल तर कोणतीही कलाकृती यशस्वी होते याच जाणीवेतून एफटीआयआयने लेखक अ‍ॅकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एफटीआयआयच्या नियामक मंडळाने व सोसायटीने या निर्णयाला मान्यता दिली असून, आगामी काही महिन्यांत एफटीआयआयमध्ये लेखक अ‍ॅकॅडमी स्थापन केली जाणार आहे. 
    तब्बल 22 वर्षांनंतर झालेल्या एफटीआयआयचा पदवीप्रदान सोहळ्यानिमित्ताने एफटीआयआयचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक बी. पी. सिंग यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, मनोरंजन क्षेत्राला कौशल्य विकसित असलेल्या लेखकांची गरज आहे. या क्षेत्राला लेखकांची वानवा जाणवू लागली आहे. दर्जेदार संहितेमुळेच चित्रपट यशस्वी ठरवू शकतो. लेखकाने चित्रपट माध्यमासाठी लिखाणाचे तंत्र शिकले पाहिजे. लेखकाने पटकथा लिहिली आणि तो मोकळा झाला, असे आता नाही. तर, हा आशय पडद्यावर कसा साकारतो, या प्रक्रियेतही लेखक असला पाहिजे. चित्रपट, मालिका, वेबसीरिज, जाहिराती, नाटक यासाठी कौशल्याने आणि आशयपूर्ण लेखन करतील. शक्यतो प्रादेशिक भाषेत शिकविण्याचा आमचा प्रयत्न असेल. 
    सध्या एफटीआयआयमध्ये पटकथा लेखन  हा विषय अभ्यासक्रमात असला तरी स्वतंत्र अ‍ॅकॅडमीमुळे लेखन विषयावर लक्ष केंद्रित करता येणार आहे. मनोरंजन माध्यमाचे स्वरूप बदलत असून आशयघन चित्रपट, मालिका, नाटक निर्मितीसाठी लेखन विषयाला प्राधान्य दिले जाणार आहे. वेबसीरिजच्या वाढत्या रेट्यामुळे दर्जेदार आशयाची गरज भासू लागली आहे. यादृष्टीने लेखन तंत्र उमगलेले लेखक घडविले जातील, याकडे  सिंग यांनी लक्ष वेधले. 
  ------------
कॉर्पोरेट क्षेत्राकडून एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांसाठी निधी उभारणार
  एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांसाठीही कॉर्पोरेट कंपन्यांनी आर्थिक गुंतवणूक करावी, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या वर्षांत कॉर्पोरेट कंपन्यांकडून किमान पाच कोटी निधी उभा करून एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना तो प्रकल्पासाठी दिला जाईल. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या चांगल्या कल्पनांसाठी पन्नास लाख रुपये निधी देऊन दर्जेदार माहितीपटांची निर्मिती करता येईल. सरकारकडे पैसा नसल्यामुळे निर्मितीला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राला सहभागी करून घेण्याशिवाय पर्याय नाही. या प्रकल्पातून माहितीपटांची व लघुपटांची चळवळ उभी राहू शकते, असे बी. पी. सिंग यांनी सांगितले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Author Academy' in FTII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.