राहुल गांधींना खोट्या खटल्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे गोवून अडकवण्याचा प्रयत्न - वकील
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:36 IST2025-07-29T18:36:02+5:302025-07-29T18:36:17+5:30
सात्यकी सावरकर यांच्यावर न्यायालय अवमानाची कारवाई व्हावी, राहुल गांधी यांच्या वकिलांचा पुणे न्यायालयात अर्ज दाखल

राहुल गांधींना खोट्या खटल्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे गोवून अडकवण्याचा प्रयत्न - वकील
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील बदनामी प्रकरणात खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यात न्यायालयाने निर्देश देऊनही फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांचे मूळ भाषण असलेली सीडी तसेच तिचे प्रमाणित शब्दांकन दिलेले नाही. न्यायालयाच्या स्पष्ट आदेशांचे वारंवार उल्लंघन केल्याने, त्यांच्यावर न्यायालय अवमानाची कारवाई सुरू करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी मंगळवारी (दि. २९) विशेष एमपी-एमएलए प्रथम वर्ग न्यायालयात दाखल केला.
या खटल्याची सुनावणी न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात सुरू आहे. खटल्यात फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांनी लंडन येथे दिलेल्या एका भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत बदनामीकारक विधाने केल्याचा आरोप केला आहे. त्यावरून मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.
अर्जात काय म्हटले आहे?
सात्यकी सावरकर यांचा हा बदनामीचा खटला हा केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित नसून, हे एक राजकीय सूड व व्यापक योजनाबद्ध छळयंत्रणेचा भाग असल्याचे दिसते. धर्मनिरपेक्षता व लोकशाही मूल्यांच्या विरोधात असलेल्या विचारधारेची मंडळी देशभरातील विविध न्यायालयांमध्ये खोटे खटले दाखल करून न्यायप्रक्रियेचा दुरुपयोग करत आहेत. राजकीय सभांमधून किंवा जाहीर कार्यक्रमादरम्यान सत्ताधारी व इतर पक्षांचे नेते ज्यांचे राजकीय अस्तित्व महत्त्वाचे आहे. त्यांनी उघडपणे व वारंवार अत्यंत अपमानास्पद, अश्लील, खालच्या पातळीवरील, बदनामीकारक भाषा वापरून स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू, स्वर्गीय राजीव गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या विषयी अश्लाघ्य टीका केली आहे. मात्र काँग्रेस पक्षाचा कोणताही नेता किंवा कार्यकर्त्याने कधीही सूडबुद्धीने किंवा द्वेषपूर्वक खोटे गुन्हे दाखल करण्याचा मार्ग निवडलेला नाही. ही संयमाची भूमिका केवळ राहुल गांधी यांच्या सत्य व अहिंसा या गांधीवादी मूल्यांवरील निष्ठेमुळे आणि भारतीय संविधान व कायद्याच्या राज्याबद्दल असलेल्या गाढ आदरामुळे शक्य झालेली आहे. असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीचा उद्देश न्याय मिळवणे नसून, राहुल गांधी यांना त्यांच्या सार्वजनिक जबाबदाऱ्या पार पाडण्यापासून रोखणे व त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करणे हाच आहे. अशा कृतींमधून कायद्याचे राज्य आणि न्यायप्रक्रियेचे सन्मान यांच्या प्रती असलेला संपूर्ण अनादर स्पष्ट दिसतो. त्यामुळेच फिर्यादी माननीय न्यायालयाच्या आदेशांचे पालन न करता न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान करत आहे.
राहुल गांधी खोट्या खटल्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे गोवून अडकवण्याचा प्रयत्न हा संविधान विरोधी आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे, असेही अॅड. पवार यांनी अर्जाद्वारे न्यायालयात नमुद केले. राहुल गांधी यांच्या वतीने दाखल करण्यात आलेला हा न्यायालय अवमान अर्ज न्यायालयाने स्वीकारला असून, यावर पुढील सुनावणी दि. १३ ऑगस्ट रोजी होणार आहे.