महिलेला लघवी पाजण्याचा प्रयत्न, विनयभंग प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 21:25 IST2022-05-22T21:25:27+5:302022-05-22T21:25:40+5:30
शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण केली. तसेच तिला जबरदस्तीने लघवी पाजण्याचा प्रयत्न केला.

महिलेला लघवी पाजण्याचा प्रयत्न, विनयभंग प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी :
शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण केली. तसेच तिला जबरदस्तीने लघवी पाजण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सूसगाव येथे १५ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि. २१) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिला सासऱ्यासोबत तिच्या चुलत सासऱ्याकडे गेली. तुम्ही आम्हाला शिवीगाळ का केली, असा जाब महिलेने विचारला. या कारणावरून संतप्त झालेल्या आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी व त्यांच्या सासऱ्यांना चप्पल, काठी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपींनी बाटलीमध्ये लघवी गोळा करून ती फिर्यादी यांना जबरदस्तीने पाजण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य आरोपींनी केले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या सासऱ्यांना आरोपींनी घरात डांबून ठेवले, असे फिर्यादीत नमूद आहे.