Pune | काजूकतली फुकट दिली नाही म्हणून पुणे शहरात भरदिवसा गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 10:04 IST2022-12-21T09:59:34+5:302022-12-21T10:04:57+5:30
दोन गावठी पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत...

Pune | काजूकतली फुकट दिली नाही म्हणून पुणे शहरात भरदिवसा गोळीबार
धायरी (पुणे) : काजूकतली फुकट दिली नाही म्हणून स्वीट मॉलमध्ये गोळीबार केला गेला. ही धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे मुख्य रस्त्यालगत फुलपरी स्वीट मॉल आहे. सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास या दुकानात दोन तरुण आले त्यांनी एक किलो काजू कतली घेतली मात्र दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या तरुणांनी त्या दुकानदारावर गावठी पिस्तूल रोखून गोळी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी बाहेर आली नाही. त्यानंतर त्या तरुणांनी पुन्हा पिस्तूल नीट तपासून गोळी झाडली. मात्र गोळी दुकानातच पडली. या सर्व गोंधळात त्या ठिकाणी गर्दी जमल्याचे पाहून आरोपींनी धूम ठोकली.
घटनेनंतर दुकानदारांनी खेळण्यातील बंदूक समजून त्या घटनेकडे दुर्लक्ष केले. मात्र व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुने यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांना झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच दुकानात बंदुकीतून पडलेली गोळी ताब्यात घेऊन तपासली असता, ती खरी असल्याचे लक्षात आले.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लागलीच आरोपींचा शोध घेतला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाससह एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त केले आहेत. भर रस्त्यालगत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.