पुण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्या कारवर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 09:13 IST2025-05-20T09:11:49+5:302025-05-20T09:13:21+5:30
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

पुण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्या कारवर गोळीबार
किरण शिंदे, पुणे: शहरातील गणपती माथा परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्या गाडीवर अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, निलेश घारे हे गणपती माथा येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. याच दरम्यान कार्यालयाबाहेर पार्क केलेल्या त्यांच्या चारचाकी गाडीवर दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून तात्काळ पसार झाले. गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसर सील करून फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले आहे. गाडीवर किती गोळ्या झाडल्या आहे? कोणत्या प्रकारच्या बंदुकीचा वापर करण्यात आला याचा तपास सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निलेश घारे यांचा राजकीय वावर, त्यांचे कुणाशी वैर आहे का? तसेच त्यांचा कुणाशी वाद झाला का? यांची माहिती घेण्याचे काम पोलीस करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून घारे स्थानिक राजकारणात सक्रिय झाले होते. त्यामुळे हे राजकीय सूडाचे स्वरूप असू शकते, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांकडून तपास सुरु, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
या घटनेमुळे गणपती माथा परिसरात तणावाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीती असून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली आहे.