Pune Crime: कोयत्याने वार करून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न; घावामुळे तुटले हाताचे बोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 14:09 IST2022-10-04T14:08:16+5:302022-10-04T14:09:38+5:30
हा प्रकार धनकवडीतील चव्हाणनगरमधील निर्मल पार्क येथे एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरसमोर शनिवारी रात्री ९ वाजता घडला.....

Pune Crime: कोयत्याने वार करून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न; घावामुळे तुटले हाताचे बोट
पुणे : काहीही कारण नसताना, ओळख नसताना तिघा गुंडांनी तरुणावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात तरुणाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या शेजारील बोट तुटले आहे.
याप्रकरणी शिवशंकर प्रभाकर थोरात (वय २७, रा. शिळीमकर चाळ, संभाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अजिंक्य संतोष गोळे (२३ रा. सावरकर चौक धनकवडी), विवेक प्रल्हाद कदम (२३, रा. शिवप्रताप कॉलनी, आंबेगाव पठार), दत्तात्रय ऊर्फ दत्तू दशरथ ऐवळे (१९, रा. दत्तनिवास बिल्डिंग, आंबेगाव पठार) या तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडीतील चव्हाणनगरमधील निर्मल पार्क येथे एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरसमोर शनिवारी रात्री ९ वाजता घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी थोरात यांनी एटीएम सेंटरमधून पैसे काढून ते आपल्या दुचाकीवर बसले असताना तिघेजण तेथे आले. त्यांच्यातील एकाने थोरात यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तेव्हा त्यांनी आपला हात मध्ये केला. त्याने दुसरा वार केला. त्यात त्यांचे बोट तुटले. मनगटावर वार केले. ते खाली पडल्याने उठून उभे राहत असताना दुसऱ्या गुंडाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिसऱ्या गुंडाने कोयत्याने त्यांच्या पाठीवर व कमरेवर पुन्हा वार करून गंभीर जखमी केले. ‘हम यहाँ के भाई है, आम्ही तुला मारून टाकू" असे म्हणत दहशत माजवली. पोलीस उपनिरीक्षक खंडाळे तपास करीत आहेत.