Pune: पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 02:39 PM2024-02-19T14:39:01+5:302024-02-19T14:42:36+5:30

घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे....

Attempt to burn woman alive due to parking dispute, shocking incident in Pune | Pune: पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune: पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. शहरातील अनेक परिसरात कोयता गँगने धुमाकूळ तर घातला आहे. दुसरीकडे पोलिसही यावर योग्य ती कारवाई करत नाहीत. येरवडा, लोहगाव परिसरात कोयते मिरवत दहशत माजविण्याचा प्रकार ताजा असतानाचआता पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला. शहरात पार्किंगच्या वादातून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार खराडी परिसरात घडला. यावेळी महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गाडी पार्क करण्याच्या कारणावरुन फिर्यादीच्या चारचाकी नेक्सॉन गाडीच्या समोरील व साईडच्या काचा लाकडी दांडक्याने फोडल्या. या गाडीच्या पुढील सिटवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली. त्याचवेळी फिर्यादींची भाडेकरु असणाऱ्या वर्षा दयाराम गायकवाड या घराच्या बाहेर आल्या असता त्यांच्या अंगावरही पेट्रोल टाकून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्या तिथून पळून गेल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर आरोपींनी तिथेच उभी असलेल्या पल्सर गाडीची टाकी फोडून नुकसान केले. या प्रकारामुळे परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाले होते. त्यावेळी आरोपी धिरज सपाटे याने कोणी मध्ये आला तर तुम्हांला सोडणार नाही असे धमकी दिली होती.

ही घटना शनिवारी (१७ फेब्रुवारी) रोजी रात्री ०९;४५ ला खराडी परिसरातील तुकाराम नगरात घडली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे करत आहेत.

पोलिसांचा वचक संपला ?

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चार्ज घेतल्यानंतर शहरातील गुंडांची परेड घेतली होती. त्यावेळी प्रत्येकाला तंबी देऊन पाठवले होते. पण त्यानंतरही शहरातील गुन्हे कमी होताना दिसत नाहीत. कोयत्याने वार करून दहशत निर्माण करणे, भरदिवसा होणाऱ्या बलात्काराच्या घटना, चोरीच्या घटनांचे वाढलेले प्रमाण यामुळे सामान्य पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. वाघोलीतील पोलीस स्टेशनसमोरच एका युवकाने स्वतःला पेटवून दिले होते. त्यात त्याचा मृत्यूही झाला. याप्रकरणी काही पोलीस अधिकारी निलंबित करण्यात आले होते. पण काही केल्या शहरातील गु्न्ह्यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसत आहे.

Read in English

Web Title: Attempt to burn woman alive due to parking dispute, shocking incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.