दुर्मिळ स्टार कासव विक्रीच्या प्रयत्नात असलेला अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 01:14 IST2019-01-25T01:14:45+5:302019-01-25T01:14:51+5:30
स्टार कासव बाळगल्यास पैशांचा पाऊस पडतो आणि बाजारात त्याला मोठी किंमत मिळते.

दुर्मिळ स्टार कासव विक्रीच्या प्रयत्नात असलेला अटकेत
पुणे : स्टार कासव बाळगल्यास पैशांचा पाऊस पडतो आणि बाजारात त्याला मोठी किंमत मिळते़ त्यामुळे स्टार कासवाची तस्करी होते. या कासवांच्या विक्रीच्या तयारीत असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे़ त्याच्याकडून दोन स्टार कासव जप्त केले.
प्रशांत सुदाम सातपुते (वय २९, रा़ एरंडवणा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, खिलारेवाडी परिसरातील प्रशांत सातपुते याच्याकडे स्टार कासव असल्याची माहिती युनिट तीनचे पोलीस कर्मचारी नितीन रावळ यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर वनखात्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार व वनपरिमंडळ अधिकारी गणेश सरोदे यांच्यासह पोलिसांनी तेथे छापा टाकून दोन कासव जप्त केले.
हा कासव नामशेष होत असलेल्या प्राण्यांपैकी आहे. ताब्यात घेतलेले कासव कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथे सोपविले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक निकम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय म्हेत्रे, सहायक पोलीस फौजदार किशोर शिंदे, मच्छिंद्र वाळके, नितीन रावळ, कैलास साळुंखे, रोहिदास लवांडे, गजानन गनबोटे, विल्सन डिसोजा यांच्या पथकाने केली.