सैफवर हल्ला ही वस्तूस्थिती; कायदा सुव्यवस्था बिघडली बोलणाऱ्यांनी भान ठेवून बोलावे - दादा भुसे
By राजू इनामदार | Updated: January 17, 2025 18:32 IST2025-01-17T18:31:30+5:302025-01-17T18:32:23+5:30
राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असे एका घटनेने म्हणता येणार नाही

सैफवर हल्ला ही वस्तूस्थिती; कायदा सुव्यवस्था बिघडली बोलणाऱ्यांनी भान ठेवून बोलावे - दादा भुसे
पुणे: सैफ अली खान या अभिेनेत्यावर हल्ला झाला ही वस्तुस्थिती आहे, पण याचा अर्थ लगेचच कायदा व सुव्यवस्था बिघडली असे म्हणता येणार नाही. असे बोलणाऱ्याने थोडे आपल्या जबाबदारीचे भान ठेवून बोलावे अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी केली. महापालिका निवडणुक कधीही झाली तरी शिवसेना त्यासाठी तयार आहे असे ते म्हणाले.
शिक्षण संचालकांच्या बैठकीसाठी म्हणून मंत्री भुसे शुक्रवारी पुण्यात आले होते. बैठकीनंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळा क्रमांक ५२ ला भेट दिली. तेथील मुलांनी गाणे गाऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पुण्यात पत्रकारांबरोबर बोलताना भुसे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असे एका घटनेने म्हणता येणार नाही असे मत व्यक्त केले. घटना घडली, त्याचा तपास सुरू आहे, पोलिस शोध घेत आहेत, कारणे पहात आहेत. मुंबई हे राज्यातील व देशातील महत्वाचे शहर आहे. पोलिस तपासाआधीच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असे बोलणाऱ्यांनी या शहराच्या महत्वाचे थोडे भान ठेवावे असे ते म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील स्मारकासंबधीच्या समितीवरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना काढून टाकण्याची मागणी शिंदेसेनेकडून झाली होती, याबाबत विचारले असता भुसे यांनी यावर बोलणे टाळले.
महापालिका निवडणुकीचे तुमचे काय नियोजन यावर भुसे यांनी सांगितले की शिवसैनिक कोणत्याही निवणुकीसाठी कधीही तयार असतो. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या शिकवणुकीनुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशीच आमची भूमिका आहे. बोगस शाळांवर आम्ही नक्की कारवाई करू. सीबीएससी पॅटर्न मराठी शाळांमध्ये आणण्याचे नियोजन सुरू आहे. १० वी, १२ वी परिक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असे ते म्हणाले. खासगी शाळा असल्या तरीही त्यांच्या फि वर काहीतरी मर्यादा ही हवीच असेही भूसे यांनी सांगितले.