पुणे : अश्लीलतेचा प्रचार केल्याप्रकरणी इंडियाज गॉट लेटेंट या यूट्यूब शोवर ईशान्येकडील राज्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कॉमेडियन समय रैनाला समन्स बजावण्यासाठी आसामपोलिसांचे एक पथक गुरुवारी (दि. १३) रात्री उशिरा पुण्यात दाखल झाले होते. आसामपोलिसांनी बाणेर पोलिसांची मदत घेत रैनाच्या घरी त्याला तपासासाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले. त्यानंतर आसाम पोलिसांचे पथक माघारी गेले.
सोशल मीडियावर समय रैनाच्या रिॲलिटी शोदरम्यान त्याने लैंगिक संबंधांबद्दल रणवीर अलाहबादिया याने भडक टिप्पणी केली. त्यामुळे देशभरात त्याच्या या वक्तव्याविरोधात संतापाची लाट आहे. अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. समय रैनाचा पुण्यातील बाणेर परिसरात फ्लॅट असल्याने, तेथे समन्स बजावण्यासाठी आसाम पोलिस शहरात आले होते. त्यावेळी रैना घरात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अलाहबादिया आणि रैना यांच्याशिवाय आसाममधील या प्रकरणात आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा माखिजा यांची नावे आहेत. आसाम पोलिसांनी अलाहबादिया आणि चंचलानी यांना यापूर्वीच समन्स बजावले आहे आणि त्यांनी शोदरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात वैयक्तिकरीत्या उपस्थित राहण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र सायबर, सायबर आणि माहिती सुरक्षा विभाग आणि मुंबई पोलिस देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत.महाराष्ट्र सायबरने आतापर्यंत किमान ५० जणांना या प्रकरणासंदर्भात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स पाठवले आहेत. त्यामध्ये शोमध्ये सहभागी झालेल्यांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. रैनाला १८ फेब्रुवारी रोजी त्याचे म्हणणे रेकॉर्ड करण्यासाठी बोलावण्यात आले होते, परंतु त्याने काही वेळ मागितला आहे. रैना सध्या त्याच्या शोसाठी अमेरिकेत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.