Muncipal Election: इच्छुक लागले तयारीला; मतदारांना आर्कषित करण्यासाठी देवदर्शन सहली, आधार कार्ड केंद्र, अनेक नवे फंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:18 IST2025-09-16T15:18:04+5:302025-09-16T15:18:50+5:30
आधार कार्ड केंद्र, विविध शासकीय दाखले मोफत देण्यासह अनेक फंडे व्होट बँक तयार करण्यासाठी इच्छुकांकडुन वापरले जात आहेत.

Muncipal Election: इच्छुक लागले तयारीला; मतदारांना आर्कषित करण्यासाठी देवदर्शन सहली, आधार कार्ड केंद्र, अनेक नवे फंडे
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होऊन त्यावर हरकती सूचनांची सुनावणी झाली आहे. त्यामुळे सर्व पक्षांतील इच्छुक तयारीला लागले आहेत. आता पासूनच स्वतःची व्होट बँक तयार करण्यासाठी आणि मतदारांना आर्कषित करण्यासाठी नवरात्र उत्सव डोळ्यासमोर ठेवून अनेक इच्छुकांनी आता कोल्हापुरच्या महालक्ष्मीदेवी सहविविध ठिकाणी देवदर्शन सहलीचे आयोजन केले आहे.
पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी जाहीर झाली. त्यानंतर प्रभाग रचनेवर ५ हजार ९२२ हरकती आणि सूचना आल्या होत्या. त्यावर सुनावणी झालेली असुन त्याबाबतच अहवाल नगरविकास विभागाला सादर करण्यात आला आहे. येत्या ३ते ६ ऑक्टाेंबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील सर्वपक्षीय इच्छुक आता तयारीला लागले आहेत. काही इच्छुकांचे प्रभाग तोडण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन भागामध्ये इच्छुकांनी बस्तान बसविण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. या सर्व माध्यामातुन इच्छुक व्होट बॅकचे आखाडे बांधत आहेत. कोल्हापुरच्या महालक्ष्मीदेवी , उज्जैनची यात्रा यासह विविध ठिकाणी देवदर्शन सहलीचे आयोजन केले आहे. त्यासाठी बस गाड्या, रेल्वेची सोय करण्यात आली आहे . आधार कार्ड केंद्र, विविध शासकीय दाखले मोफत देण्यासह अनेक फंडे व्होट बँक तयार करण्यासाठी इच्छुकांकडुन वापरले जात आहेत.
निवडणुका डोळयासमोर ठेवुन राष्ट्रवादी परिवार मिलन उपक्रम
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात "राष्ट्रवादी परिवार मिलन" नव्या उपक्रमाला सुरुवात केली. आगामी महापालिका निवडणुक डोळयासमोर ठेवुन हा उपक्रम राबविला जात आहे. हडपसर मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांच्या घरी जात अजित पवार यांनी गाठीभेटी घेतल्या. या उपक्रमादरम्यान कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधुन चर्चा केली.