आषाढी वारी: ज्ञानोबा माऊली- तुकाराम नामघोष; टाळ - मृदंगाच्या गजरात अलंकापुरी भारावली; माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 20:18 IST2021-07-02T20:08:40+5:302021-07-02T20:18:03+5:30

आषाढी वारी : सलग दुसऱ्या वर्षी शासकीय नियमावलीत सोहळा संपन्न;अलंकापुरीतून माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान

Ashadi Wari: Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla in Alandi | आषाढी वारी: ज्ञानोबा माऊली- तुकाराम नामघोष; टाळ - मृदंगाच्या गजरात अलंकापुरी भारावली; माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

आषाढी वारी: ज्ञानोबा माऊली- तुकाराम नामघोष; टाळ - मृदंगाच्या गजरात अलंकापुरी भारावली; माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

भानुदास पऱ्हाड- 

आळंदी :              अवघाचा संसार सुखाचा करीन !
                         आनंदे भरीन तिन्ही लोक !!
                        जाईन गे माये तया पंढरपुरा !
                          भेटेन माहेर आपुलिया !!

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९० व्या आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भक्तीच्या या छोट्याखानी सोहळ्यात ना टाळाचा प्रचंड गजर झाला... ना पखवादाची थाप घुमघुमली... ना फेर - फुगड्या... ना देहभान विसरून नाचणारे वारकरी... ना मोठा हरिनामाचा गजर... ना भव्य - दिव्य स्वरूप. शासनाच्या नियमांचे पालन करत अगदी साध्या पद्धतीने संबंधित निमंत्रित वारकऱ्यांच्या समवेत सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास माउलींच्या चांदीच्या चलपादुकांनी मुख्य मंदिरातून प्रस्थान ठेवले.

प्रस्थान सोहळ्यास शुक्रवारी (दि.०२) पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर माउलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा संपन्न करण्यात आली. विणामंडपात सकाळी दहानंतर ह.भ.प. भगवान महाराज कबीर यांचे काल्याचे कीर्तन झाले. बाराच्या दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माऊलींना नैवद्य दाखविण्यात आला. त्यानंतर चारला प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात झाली. 

ब्रम्हवृंदाच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात आला. दरम्यान शासनाने परवानगी दिलेल्या प्रस्थान संबंधित मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी आदींना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर माऊलींचे दोन्ही अश्व सन्मानपूर्वक महाद्वारातून मंदिरात आणण्यात आले. माउलींची व गुरू हैबतबाबांची आरती घेऊन देवस्थानच्या विश्वस्तांकडून माउलींच्या चांदीच्या चलपादुका परंपरेनुसार पालखी सोहळा मालक राजेंद्र पवार - आरफळकर यांच्या हातात सुपूर्द करून चलपादुकांचे मंदिरातून प्रस्थान ठेवण्यात आले.

वीणा मंडपातून चलपादूका बाहेर आणल्यानंतर मंदिर आवारात उपस्थित वारकऱ्यांच्या "ज्ञानोबा - माऊली - तुकारामांच्या" जयघोषात मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने परंपरेप्रमाणे पादुका लगतच्याच आजोळघरात (दर्शनमंडप) विराजमान करण्यात आल्या. त्याठिकाणी समाजआरती घेऊन पहिल्या दिवसाचा जागर करण्यात आला. 
            
माऊलींच्या १९० व्या आषाढी वारी प्रस्थान प्रसंगी पवमान अभिषेक, ब्रम्हवृन्दांचा वेदघोष, समाधीवर माऊलींच्या मुखवट्याला दुध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. नंतर गरम पाण्याने ‘श्रीं’ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. या विधिवत पूजासमयी माऊलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षक दिसून येत होते.

 

Web Title: Ashadi Wari: Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla in Alandi