Ashadhi Wari 2025 :‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी.. भक्ती-शक्तीचा संयाेग पुण्यातच घडला

By नम्रता फडणीस | Updated: June 21, 2025 17:56 IST2025-06-21T17:54:42+5:302025-06-21T17:56:17+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहासानुसार पुणे हे देशातील सातवे आणि महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर राहिले आहे. सतराव्या शतकात शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती.

Ashadhi Wari 2025 The union of devotion and power took place in Pune itself | Ashadhi Wari 2025 :‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी.. भक्ती-शक्तीचा संयाेग पुण्यातच घडला

Ashadhi Wari 2025 :‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी.. भक्ती-शक्तीचा संयाेग पुण्यातच घडला

पुणे : संत ज्ञानेश्वर, छत्रपती   शिवाजी महाराज, जिजाबाई, संत तुकाराम, पहिले बाजीराव पेशवे, बालाजी बाजीराव, माधवराव पहिले, नाना फडणवीस, महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा जाेतिराव फुले, गोपाळ गणेश आगरकर, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, धोंडो केशव कर्वे आणि पंडिता रमाबाई यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींसह पुणे ऐतिहासिकदृष्ट्या एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहासानुसार पुणे हे देशातील सातवे आणि महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर राहिले आहे. सतराव्या शतकात शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती. या जहागिरीमध्ये राजमाता जिजाऊ वास्तव्यास असताना १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजीराजे महाराज यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या कार्यात संत तुकाराम महाराजांनी कीर्तनातून केलेल्या समाजप्रबोधनाचा वाटा माेलाचा राहिला आहे. याच पुण्यातून भक्ती-शक्तीचा संयाेग घडला आहे.

‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी

नामदेव हे आद्य कीर्तनकार मानले जातात. ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी’ ही नामदेवांची भूमिका होती. भजनकीर्तनांच्या योगे विठ्ठलाची कीर्ती त्यांनी देशभर पोहोचविली. पंजाबात अनेकांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. नामदेवांनी हिंदी भाषेत रचले ली ६१ पदे शिखांच्या ग्रंथसाहिबात अंतर्भूत आहेत. वारकरी संप्रदायाची दीक्षा घेण्याचा विधी अगदी साधा असतो. या संप्रदायात फड असतात. दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याला अशा एखाद्या फडप्रमुखाकडून तुळशीच्या १०८ मण्यांची माळ घालून घ्यावी लागते. फडप्रमुख सुरुवातीला ती माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतो आणि प्रतिवर्षी पंढरीची वारी करण्याचे वचन दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याकडून घेतो. पंढरपूरची किमान एक तरी वारी केलीच पाहिजे. तसेच आळंदीची वारीही केलीच पाहिजे. संप्रदायाच्या इतर नियमांची आणि आचारधर्माची कल्पनाही दिली जाते. मग ‘पुंडलीक वरदा हरिविठ्ठल’चा गजर करत तुळशीची माळ गळ्यात घातली जाते. पंढरीची वारी पायीच करण्याचा प्रघात एके काळी होता व आजही अनेक वारकरी तो पाळतात. एरव्ही ठिकठिकाणी विखुरलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर एकमेकांना भेटतात.

नामस्मरणाने साधली भक्ती

वारकरी सांप्रदायाने ज्ञानाचे महत्त्व कमी आहे, असे कधीच मानले नाही, परंतु भक्तीला अग्रस्थान दिले. नामसंकीर्तनानेही ईश्वराच्या जवळ जाता येते, हे आत्मविश्वासाने सांगितले. ‘नलगे सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण।’ असे तुकोबारायांनी म्हटले आहे. संत नामदेव महाराज एखाद्या लडिवाळ लेकरासारखे ईश्वराजवळ जाऊ पाहतात, असेच इतरांना जाता यावे, यासाठी प्रयत्न करतात. देवावर रुसणे, हट्ट धरणे, त्याची करुणा भाकणे, अशा भावावस्था त्यांच्या अभंगांतून दिसते.

‘तुका म्हणे तोचि संत । सोशी जगाचे आघात’
‘दिवट्या छत्री घोडे । हे तो बऱ्यात न पडे’
‘राजगृहा यावे मानाचिये आसे । तेथे काय वसे समाधान’
‘प्रभू तुम्ही महेशाचिया मूर्ती ।
आणि मी दुबळा अर्चितुसे भक्ती’


संत एकनाथांनी केला ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्वार

‘आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध । देहाचा विटाळ देहीच निर्धारी । म्हणतसे महारी चोखियाची ।।’ असे उद्गार चोखामेळ्यांच्या पत्नी सोयराबाई  यांनीही एका अभंगात काढले आहेत. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।। ‘ या तुकोबारायांच्या उक्तीमध्ये ही अभेदभावाची भूमिकाच स्पष्ट झालेली आहे. चोखोबांच्या समाधी पुढे संत एकनाथ नतमस्तक झाले, तसेच अन्य वारकरीही  होतात. एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील समाधीचा जीर्णोद्वार केला, तसेच ज्ञानेश्वर-नामदेवांच्या काळानंतर आलेल्या तमोयुगात अनेक अशुद्धे शिरलेली  ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली.

भरणी आली मुक्त पेठा ।
करा लाटा व्यापार ।
उधार घ्यारे उधार घ्यारे।
अवघे या रे जातीचे ।
येथे पंक्ति भेद नाही । मोठे काही लहान ।
तुका म्हणे माल घ्यावा ।
मुद्दल भावा जतन ।।


पुण्यातीलच नानामहाराज साखरे यांनी सार्थ ज्ञानेश्वरी प्रसिद्ध केली, तर विष्णुबुवा जोगांनी तुकारामबोवांच्या अभंगांची सार्थ आवृत्ती काढली. विष्णुबुवांनी आळंदी येथे वारकरी शिक्षणसंस्थाही काढली (१९१७). नानामहाराज साखरे, शं. वा. दांडेकर ऊर्फ सोनोपंत दांडेकर यांनी वारीत कधीच खंड पडू दिला नाही. तसेच वारकरी साहित्य विपूल प्रमाणात पुढे आणले आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबा पिपंळनेरकर (मृ. सु. १७५३) यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिरूरचा. परंतु नगर जिल्ह्यातील पिंपळनेर या गावी ते स्थायिक झाल्यामुळे पिंपळनेरकर म्हणून ओळखले जाऊ लागले.
 
पुण्यातील जाेग महाराजांनी केला कीर्तन पद्धतीत बदल
वारकरी कीर्तन हरिदासी कीर्तनापेक्षा वेगळे असते. त्यात गाण्यापेक्षा भजनावर अधिक भर असतो. वारकरी कीर्तनाचीही पूर्वीची पद्धत आणि आजची पद्धत ह्यात थोडा फरक आहे. राउळात जाऊन विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर देवाला पाठ न दाखविता भजन करीत मागेमागे जाऊन चंद्रभागेच्या वाळवंटात यायचे आणि कीर्तनास आरंभ करायचा, ही जुनी पद्धत होती. वारकरी संप्रदायातील विख्यात कीर्तनकार विष्णुबुवा जोग यांनी ही पद्धत बदलली, कारण अशी कीर्तनपद्धती गावोगावी अवलंबिणे शक्य नव्हते. वारकरी कीर्तनाचे पूर्वरंग व उत्तर रंग, असे दोन भाग विष्णुबुवा जोग यांनीच केले. मुळात वारकरी कीर्तने नदीच्या वाळवंटात होत, याचे पुरावे संतांच्या अभंगांतून मिळतात. हे जाेग महाराज पुण्याचे हाेते.

 

Web Title: Ashadhi Wari 2025 The union of devotion and power took place in Pune itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.