Ashadhi Wari 2025: श्रीक्षेत्र देहू संस्थानने भाविकांसाठी प्रथमच प्रसिद्ध केला आचारधर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:01 IST2025-06-12T12:00:47+5:302025-06-12T12:01:17+5:30
'भेटीलार्गी जीवा लागलीसे आस। पाहे रात्रंदिवस वाट तुझी' अशी भावना वारकऱ्यांची झाली असून, त्यांना श्रीक्षेत्र देहू-आळंदी-पंढरपूरचे वेध लागले आहेत.

Ashadhi Wari 2025: श्रीक्षेत्र देहू संस्थानने भाविकांसाठी प्रथमच प्रसिद्ध केला आचारधर्म
पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू येथून बुधवारी (दि. १८) श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. हा सोहळा केवळ आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. 'पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत' या संत वचनाप्रमाणे लाखो भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहू-आळंदीत येत आहेत. मागील काही वर्षांमध्ये ही संख्या कमालीची वाढली आहे. परिणामी काही समस्या उद्भवत आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी आणि भाविकांसाठी देहू संस्थानने प्रथमच आचार धर्म (नियमावली) प्रसिद्ध केला आहे.
संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव संत नारायण महाराज यांनी १६८५ साली सुरू केलेला आषाढी वारी पालखी सोहळा आज महासागरासारखा झाला आहे. स्वयंशिस्तीत सुरू असलेल्या या सोहळ्याकडे पाहून देश-विदेशातील नागरिकसुद्धा भारावून गेले आहेत. सर्व जाती-धर्माना सामावून घेणारा, एकात्मतेचा संदेश देणारा, सामाजिक कार्याची जाणीव असणारा वारकरी संप्रदाय लाखोंच्या संख्येने स्वयंशिस्तीत आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी निघणार आहे. 'भेटीलार्गी जीवा लागलीसे आस। पाहे रात्रंदिवस वाट तुझी' अशी भावना वारकऱ्यांची झाली असून, त्यांना श्रीक्षेत्र देहू-आळंदी-पंढरपूरचे वेध लागले आहेत. पूर्णपणे शिस्तीने चालणारा आषाढी वारी पायी पालखी सोहळा यंदाही अनुचित प्रकार न घडता, निर्विघ्नपणे पार पाडावा. हा सोहळा अधिक शिस्तप्रिय होण्यासाठी आणि नवीन सहभागी भाविकांना सोहळ्याचे नियम माहीत व्हावेत, यासाठी संस्थानने यंदा प्रथमच आचार धर्म (नियमावली) प्रसिद्ध केला आहे.
असा आहे आचारधर्म...
दिंडीतील सर्व पताका (वारकरी ध्वज) सुती कापड असलेल्या व काव रंगाचा वापर केलेल्या असाव्यात.
पताकाधारी यांच्या मागे टाळकरी, मृदंग वादक, विणेकरी, नंतर तुळशीवाली आणि महिला वारकरी असा क्रम असावा.
दिंडीतील वारकऱ्यांनी पांढरे शुभ्र धोतर, शर्ट, टोपी अथवा पायजमा परिधान करावा,
विणेकऱ्याने धोतर, फेटा परिधान करणे आवश्यक आहे.
दिंडीतील भजन हे वारकरी संप्रदायाच्या देहूकर फडाप्रमाणे असावे, भजन गौळण-हरिपाठ हे सांप्रदायिक चालीप्रमाणे असावे. (काकडा सकाळी लवकर व्हावा)
दिंडीत सहभागी होऊन कोणतेही व्यसन करू नये.दिंडीत चालताना सोहळा सोडून मागे-पुढे चालू नये.
रिंगणात दिंडीतील सर्व पताकावाले, टाळकरी, विणेकरी, तुळशी वाली, हांडेवाली, पखवाज सहभागी व्हावे.