पुणे पदवीधरमध्ये अरुण लाड आणि शिक्षकमध्ये आसगावकर यांची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 07:34 PM2020-12-03T19:34:42+5:302020-12-03T19:38:18+5:30

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर विधान परिषद मतदार संघाची मतमोजणी पुण्यातील बालेवाडी येथे सुरू आहे.

Arun Lad of Mahavikas Aghadi in Pune graduates and Asgaonkar in the teacher election on lead | पुणे पदवीधरमध्ये अरुण लाड आणि शिक्षकमध्ये आसगावकर यांची आघाडी

पुणे पदवीधरमध्ये अरुण लाड आणि शिक्षकमध्ये आसगावकर यांची आघाडी

googlenewsNext

पुणेपुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघात सध्या वैध व अवैध मते निश्चित करण्याचे व पहिल्या पसंती क्रमांकाची मते मोजण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पदवीधर मतदार संघात महाआघाडीचे अरुण लाड तर शिक्षक मतदार संघात जयंत आसगावकर हे दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. मतदानाचा ट्रेन्ड असाच कायम राहिल्यास महाआघाडीचे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंती क्रमांकच्या मतामध्ये निवडून येऊ शकतात. 

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर विधान परिषद मतदार संघाची मतमोजणी पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये सुरू आहे. पदवीधर मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या महा विकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. तर भाजपचे संग्राम देशमुख दुस-या क्रमांकावर आहेत. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या पसंतीचे मत दिलेल्या मतपत्रिका ची निवड करण्याचे काम सुरू आहे. पदवीधर मतदार संघात 112 टेबल लावण्या आले आहेत. एका टेबलवर 2200 मतपत्रिका देण्यात आल्या असून, आता पर्यंत एका टेबलवर सुमारे 800 ते 900 मतपत्रिकांची मोजणी झाली असून, अद्याप एका टेबलवर 1400 मतपत्रिका वैध, अवैध व पहिली पसंती क्रमांक ठरवणे शिल्लक आहे. पदवीधर मध्ये अवैध मतपत्रिका बाद होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पदवीधर मतदार संघाचा अंतिम निकाल हाती देण्यासाठी शुक्रवार उजाडेल. 
----------
शिक्षक मतदार संघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर 
शिक्षक मतदार संघातील  70-80 टक्क्यांपेक्षा अधिक मतपत्रिका वैध, अवैध व पहिल्या पसंती क्रमांकाची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. यात महा विकास आघाडीचे जयंत आसगावकर पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये पुढे असून, माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांनी देखील चांगली मते घेतली आहेत. तसेच मते बाद होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे.

पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेमध्ये वैध मतांची संख्या निश्चित झाल्यानंतर विजयी उमेदवारासाठी कोठा निश्चिती केली जाईल.  शिक्षक मतदारसंघांमध्ये 52978 मतदान झाले त्यामध्ये सुमारे तीन ते चार टक्के मतपत्रिका अवैध ठरण्याचे प्रमाण आहे.  त्यामुळे सुमारे 50 हजार वैध मतांची संख्या लक्षात घेता शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीची 25 हजार पेक्षा अधिक मते मिळाल्यास उमेदवार विजयी घोषित केला जाणार आहे. मध्यरात्रीपर्यंत कोठा निश्चिती होईल. यात पहिल्या पसंतीचा  आसगावकर यांनी 25 हजारांचा कोटा पूर्ण केल्यास विजय घोषित केला जाऊ शकतो. 
--------

Web Title: Arun Lad of Mahavikas Aghadi in Pune graduates and Asgaonkar in the teacher election on lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.