शहरात नव्या ५ पोलिस ठाण्यांना मंजुरी; पोलिस आयुक्तांच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 21:45 IST2025-09-15T21:44:28+5:302025-09-15T21:45:24+5:30

८३० मनुष्यबळही मिळणार

approval for 5 new police stations in the pune city police commissioner efforts a success | शहरात नव्या ५ पोलिस ठाण्यांना मंजुरी; पोलिस आयुक्तांच्या प्रयत्नांना यश

शहरात नव्या ५ पोलिस ठाण्यांना मंजुरी; पोलिस आयुक्तांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : शहराचा विस्तार वाढत असून, पुणे ही ‘फ्युचर सिटी’ आहे. आयटी, उद्योग, शिक्षणासह विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या या शहराची वाढ विचारात घेऊन पुढील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुणे शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात येणार आहे. याशिवाय अतिरिक्त एक हजार पोलिस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ८ ऑगस्ट रोजी शहरात केली होती. त्यानुसार सोमवारी (दि. १५) गृहविभागासह वित्त विभागाकडून शहरात नव्या ५ पोलिस ठाण्यांसह २ स्वतंत्र झोन (पोलिस उपायुक्त) ला देखील मान्यता देण्यात आली.

नव्या पोलिस ठाण्यांसाठी ८३० मनुष्यबळ देखील मंजुर करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

राज्याच्या आजवरच्या इतिहासात इतर आयुक्तालयाच्या तुलनेत अवघ्या एक वर्षाच्या आतमध्ये तब्बल १२ पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसह दोन झोन मंजूर झालेले पुणे पोलिस आयुक्तालय अव्वल ठरले आहे. पहिल्या टप्प्यात थेट ७ पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत फळाला आली. त्याठिकाणी काम करण्यासाठी शासनाने ८१६ पदांची मान्यता दिली होती. त्यानंतर आता पाच पोलिस ठाण्यांच्या निर्मितीला गृह व वित्त विभागाने हिरवा कंदील दिला असल्यामुळे नव्याने ८३० मनुष्यबळ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त संजय पाटील, डिसीपी राजलक्ष्मी शिवणकर आणि एसीपी विवेक पवार यांनी वेळोवेळी शासनाने पाठपुरावा केला.

नवी पोलिस ठाणे अशी..
१) लोहगाव (विमानतळ)

२) नऱ्हे
३) लक्ष्मीनगर (येरवडा)

४) मांजरी (हडपसर)
५) येवलेवाडी (कोंढवा)

६) दोन झोन (पोलिस उपायुक्त)

पोलिस दलाचे कामकाज होणार सक्षम...

यापूर्वी गेल्या २० वर्षात पुणे पोलिसांकडून एकाही नवीन पोलिस ठाण्यांसंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला नव्हता. त्यामुळे

वाढलेली लोकसंख्या, गुन्ह्यांचे बदललेले स्वरूप लक्षात घेता, शहरात नवीन पोलिस ठाण्यांसह मनुष्यबळाची गरज होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या ७ पोलिस ठाण्यानंतर आता या ५ नवीन पोलिस ठाण्यांमुळे पुणे पोलिस दलाचे कामकाज सक्षम होणार आहे.

नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील होतो. गृह विभागासह वित्त विभागाने आमच्या पोलिस ठाण्यांसह मनुष्यबळाची मागणी देखील मान्य केली आहे. ५ पोलिस ठाण्यांच्या उभारणीला हिरवा कंदील मिळाला असून, दोन स्वतंत्र झोन ला देखील परवानगी मिळाली आहे. येत्या महिनाभरात नवीन ५ पोलिस ठाणी कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त.

Web Title: approval for 5 new police stations in the pune city police commissioner efforts a success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.