पुण्यातील १४ नगरपरिषदा, ३ नगर पंचायतींसाठी अर्ज भरण्यास सुरुवात; जाणून घ्या, निवडणुकीचे वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:08 IST2025-11-11T11:07:57+5:302025-11-11T11:08:07+5:30
यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार

पुण्यातील १४ नगरपरिषदा, ३ नगर पंचायतींसाठी अर्ज भरण्यास सुरुवात; जाणून घ्या, निवडणुकीचे वेळापत्रक
पुणे: जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा, ३ नगर पंचायतींच्या एकूण ३९८ सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून (दि. १०) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी ॲलिस पोरे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि ३ नगरपंचायती यांच्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी १ जुलैची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी ६ लाख ३४ हजार ९४० मतदार आहेत. एक वर्षापूर्वी नव्याने अस्तित्वात आलेल्या फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेसह मंचर आणि माळेगाव या नगर पंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. फुरसुंगी उरळी देवाची नगरपालिकेसाठी द्विसदस्य पद्धतीने निवडणूक होणार असून एकूण प्रभाग संख्या ही १६ असणार आहे. तर ३२ नगरसेवकांची संख्या असणार आहे. या निवडणुकीतून नगरपरिषद आणि नगर पंचायतीसाठी थेट निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक
उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी - १० ते १७ नोव्हेंबर (दुपारी २ वाजेपर्यंत)
अर्जांची छाननी - १८ नोव्हेंबर
अर्ज माघारी - १९ ते २१ नोव्हेंबर (दुपारी तीन वाजेपर्यंत)
निवडणूक चिन्ह वाटप - २६ नोव्हेंबर
मतदान - २ डिसेंबर
मतमोजणी - ३ डिसेंबर
निवडणुकीसाठी आढावा
दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी (दि. १०) जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीसाठी आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप गिल, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, नगरविकास शाखेच्या प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी ॲलिस पोरे, नगरपालिका व नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, निवडणूक प्रक्रिया पार पाडताना आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी. निवडणुका शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्याकरिता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करावी. केलेले नियोजन व कार्यवाहीबाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. संबंधित विषयांच्या नोडल अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबतचा विस्तृत आढावा मंगळवारी (दि. ११) घेण्यात येईल.