पुणे: पुणेमेट्रो प्रवाशांना विविध ॲप्लिकेशन्सद्वारे मेट्रोचे तिकीट काढण्याचा स्मार्ट, सरळ व डिजिटल पर्याय उपलब्ध झाला आहे. शिवाय मेट्रोमध्ये (एनसीएमसी) आंतर-कार्यक्षमता प्रणाली कार्डदेखील सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना आता प्रवास करताना मेट्रो आणि एचडीएफसी बँक को-ब्रँडेड कार्डाव्यतिरिक्त देशातील कोणतेही एनसीएमसी प्रणाली कार्ड वापरण्याची सोय मिळणार आहे, या सुविधेचा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
‘वन कार्ड, वन ट्रॅव्हल, वन नेशन’ या संकल्पनेतून पुणे मेट्रोच्या प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि डिजिटल सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) द्वारे क्यूआर तिकीट प्रणाली, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) आंतर-कार्यक्षमता आणि सीसीटीव्ही व्हिडिओ ॲनालिटिक्स (व्हीए) हॅकथॉनच्या विजेत्यांचा सत्कारदेखील करण्यात आला.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही व्हिडिओ ॲनालिटिक्स हॅकथॉन अत्यंत महत्त्वाचा ठरला. या प्रणालीमुळे प्लॅटफॉर्मवर पडणे, तिकीट रांगेतील गर्दी, झटापट आणि सोडलेली वस्तू यांसारख्या घटनांसाठी एआय-आधारित रिअल-टाईम मॉनिटरिंग शक्य होणार आहे. त्यामुळे स्थानक व परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यास सोपे जाणार आहे. शिवाय प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रांगेत उभे राहणे गरजेचे नाही. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.