-हिरा सरवदेपुणे: महापालिकेच्या सणस मैदानासह नेहरू स्टेडियमच्या परिसरात अतिक्रमण करून वादनाचा सराव करणाऱ्या ढोलताशा पथकांना यंदा अटकाव करण्यात आला आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे मैदाने व परिसरात वादनाचा सराव करण्यासाठी दिलेले सर्व प्रस्ताव नाकारले आहेत. त्यामुळे यंदा महापालिकेच्या मैदानांवर व परिसरामध्ये पथकांच्या वादन सरावाला ‘नो एन्ट्री’ असणार आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहराच्या विविध भागात ढोल-ताशा पथकांचा वादनाचे केले जातात. यंदाचा गणेशोत्सव ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस असल्याने शहरातील अनेक पथकांनी वादनाचे सराव सुरू केले आहेत. हे सराव नदीपात्रातील रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत, घाटांसह शहर व उपनगरांमधील मोकळ्या व बंदिस्त मिळकतीमध्ये सुरू आहेत. या सरावासाठी शासकीय जागांसह खासगी जागांमध्येही सुरू आहेत. खासगी जागांसाठी जागामालकांची परवानगी घेतली जाते. मात्र, शासकीय जागांवर परवानगी न घेता राजकीय दबावाचा वापर करून थेट घुसखोरी केली जाते. अधिकाऱ्यांनी मज्जाव केल्यानंतर नेत्यांचे फोन येतात आणि प्रशासन हतबल होते.
असाच प्रकार मागील काही वर्षांपासून महापालिकेच्या सणस मैदान आणि पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या परिसरात घडतो. मागील वर्षी सणस मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वावर, बॉक्सिंग मैदान, कबड्डीचे मैदान आणि सणस मैदानामधील सिंथेटिक ट्रॅकच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीवर अशा चार पथकांनी घुसखोरी केली होती. याशिवाय नेहरू स्टेडियमच्या परिसरात तीन पथकांनी अतिक्रमण केले आहे. दोन्ही मैदानांच्या परिसरात दररोज सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत वादनाचे सराव चालत होता. त्यामुळे खेळाडूंना सराव करता येत नव्हता.
यंदा मात्र, क्रीडा विभागाने सुरुवातीपासूनच खबरदारी घेतली आहे. मैदानावर सरावाचे शेड मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ढोलपथकांना मज्जाव केला आहे. पथकांचे सराव शेड मारण्याचे काम थांबविण्यात आले आहे शिवाय वादनाच्या परवानगीसाठी आलेले सर्व प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासमोर ठेवले. मात्र, दिवटे यांनी क्रीडा मैदानावर सराव करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे यंदा सणस मैदान व नेहरू स्टेडियमसह इतर मैदानांवर ढोलताशा वादनाच्या सरावास ‘नो एन्ट्री’ असणार आहे.
राजकीय नेत्यांचे पाठबळ
सणस मैदान व नेहरू स्टेडियमच्या परिसरात वादनाचा सराव करणारी पथके राजकीय नेत्यांच्या मंडळांसमोर मोफत वादन करतात. त्यामुळे राजकीय मंडळी या पथकांना पाठीशी घालून अतिक्रमण करण्यास प्रोत्साहित करतात. त्यामुळे राजकीय दबावापोटी अशा पथकांवर प्रशासनाकडून कसलीही कारवाई केली जात नाही.
महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे आलेले ढोल पथकांचे प्रस्ताव
- सणस मैदान - ६- नेहरू स्टेडियम - ४- सप्तगिरी बालाजी क्रीडांगण, घोरपडी - १- हडपसर हँडबॉल स्टेडियम, माळवाडी - १
सांस्कृतिक विभागाने दिला निगेटिव्ह अभिप्राय
मैदानांवर ढोल-ताशा वादनाचा सराव करण्यास परवानगी मागणारे सर्व प्रस्ताव महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी नाकारले आहेत. मात्र, गणेशोत्सवामध्ये ढोल-ताशा पथकांना असलेले महत्त्व लक्षात घेऊन या पथकांना गणेश कला व क्रीडा मंचच्या परिसरात सराव करण्यास परवानगी देता येईल का? याची चाचपणी करण्यात आली. यासाठी सांस्कृतिक विभागाचा अभिप्राय मागवण्यात आला होता. मात्र, सांस्कृतिक विभागानेही गणेश कला व क्रीडा मंच येथे वादन सराव करण्यास निगेटिव्ह अभिप्राय दिला आहे.
‘पथकप्रमुख तुपाशी, वादक उपाशी’
शहरात तीनशेच्या आसपास ढोल-ताशा पथकांची संख्या आहे. यातील पन्नासही पथकांची नोंद धर्मादाय आयुक्तांकडे नाही. ही पथके एका तासाच्या वादनासाठी पन्नास हजार रुपयांच्या आसपास सुपारी आकारतात. एक मिरवणूक किमान दोन ते तीन तासांची असते. म्हणजे वादनासाठी पथकाला एका मिरवणुकीसाठी किमान १ लाख रुपये मिळतात. असे असताना पथकातील वादकांना एक रुपयाही दिला जात नाही. केवळ वाद्यांचा खर्च, प्रवास खर्च आणि जेवण किंवा नाष्ट्याचा खर्च पथक प्रमुख करतात. अनेकदा ज्या मंडळाकडे वादन आहे, तीच मंडळे नाश्ता व जेवणाची व्यवस्था करतात. त्यामुळे ‘पथक प्रमुख तुपाशी आणि वादक उपाशी’ अशी स्थिती आहे.
मैदानाच्या परिसरात होणाऱ्या ढोल-ताशा वादनामुळे खेळाडूंना त्रास होतो. तसेच मैदानाच्या परिसरात असलेल्या दवाखान्यांमधून या संदर्भात वारंवार तक्रारी येतात. त्यामुळे मैदानांच्या परिसरात वादन करण्यासाठी आलेले ढोल-ताशा पथकाचे सर्व प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. - किशोरी शिंदे, उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका.