कुरकुंभला दरोड्याचा आणखी एक प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 20:44 IST2018-06-19T20:44:45+5:302018-06-19T20:44:45+5:30
सीसीटीव्हीच्या माध्यमातून दरोड्याच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये सर्वत्र दिसत असल्याने नागरिक दहशतीत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

कुरकुंभला दरोड्याचा आणखी एक प्रयत्न
कुरकुंभ : कुरकुंभ-मळद (ता. दौंड) परिसरात पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या दरोड्याचा पोलिसांनी तपास लावून आरोपी जेरबंद केले असताना पुन्हा कुरकुंभ (ता. दौंड) येथील व्यापाऱ्याच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वेळीच घरातील सर्वजण सावध झाल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु, यामुळे कुरकुंभ व परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी देखील रात्रीच्या गस्तीत वाढ केली आहे. मात्र याचा परिणाम अजून तरी दिसून आलेला नाही. रात्री-बेरात्री परिसरात दुचाकीस्वारांच्या काही टोळ्या फिरत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. परिणामी, या सर्वांचा बंदोबस्त लवकर करावा व ग्रामसुरक्षा दलाला पाठबळ मिळावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.कुरकुंभ व परिसरात छोट्या छोट्या चोरीच्या घटना या ठरलेल्याच आहेत; मात्र यामधून काहीच बोध पोलिसांनी घेतला असल्याचे दिसत नाही. औद्योगिक क्षेत्रामधील परप्रांतीयांच्या नावाखाली काही अज्ञात चोरट्यांनी परिसरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे यावर प्रभावी यंत्रणा राबविण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी सामान्य कुटुंब छोट्या आवाजाला देखील घाबरत असून शेजारी एकमेकांना संपर्क करत आहे. मात्र, यामधील सत्यता तपासणे गरजेचे आहे. दरम्यान, कुरकुंभमधील व्यापारीवर्गातूनदेखील याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून दरोड्याच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये सर्वत्र दिसत असल्याने नागरिक दहशतीत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, दौंड तालुक्यातील वाढत्या घरफोडी व दरोड्याच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग दौंड गणेश मोरे यांनी प्रत्येक गावात भेटी देऊन या घटना टाळण्यासाठी ग्रामसुरक्षा दल पुनर्निर्माण करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. यामध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने नावेही दिली होती. तसेच त्यांना लागणारे साहित्य काठी, बॅटरी, ओळखपत्र व इतर खर्च करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात आले होते. मात्र याचा पाठपुरावा होऊ शकला नाही, त्यामुळे याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.