चंदननगर येथील आंबेडकर वसाहतीत किरकोळ वादातून एका ३५ वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग मनात ठेवून दोन तरुणांनी हॉकी स्टिक, लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण करत त्याचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (१२ ऑगस्ट) रात्री घडली.
साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय २१) आणि समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा (वय २२) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
चंदननगर परिसरात बेवारस अवस्थेत एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला असता, वैद्यकीय अहवालात मृत्यूचे कारण मारहाण असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चंदननगर पोलिसांनी हत्या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला.
तपासादरम्यान उघड झाले की, मृत साईनाथ याने, आरोपी आदित्य वाल्हेकरच्या चुलतीची छेड काढली होती. एवढेच नव्हे, तर तिला ‘आय लव्ह यू’ असेही म्हटले होते. याचा राग मनात धरून आदित्यने आपला मित्र समर्थ शर्मा याच्या मदतीने साईनाथला लाथा बुक्क्यांनी आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या साईनाथला तेथेच सोडून आरोपी निघून गेले. मात्र वर्मी घाव लागल्याने साईनाथचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, आरोपी आदित्य वाल्हेकर यानेच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून “एक माणूस पडला आहे” अशी माहिती दिली होती. मात्र तपास करताना पोलिसांनी त्यालाच खुनाचा सूत्रधार म्हणून गाठले आणि मित्रासह अटक केली. चंदननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१)३(५) अंतर्गत गुन्हा नोंद असून, पुढील तपास सुरू आहे."