Anant Chaturdashi 2022| राजकीय मतभेद विसरून चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे गणेश विसर्जनावेळी एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 13:50 IST2022-09-09T13:37:34+5:302022-09-09T13:50:29+5:30
गणेश विसर्जनावेळी राजकीय वैर बाजूला ठेऊन नेते एकत्र येताना दिसले....

Anant Chaturdashi 2022| राजकीय मतभेद विसरून चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे गणेश विसर्जनावेळी एकत्र
पुणे : गेल्या दोन वर्षानंतर कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात राज्यभर पार पडत आहे. सलग १० दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करून आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. पुण्यातील गणपतीच्या मिरवणुका पाहणे अनुभवने म्हणजे वेगळीच मजा असते. ढोल-ताशांचा आवाज, हजारोंच्या तोंडी बाप्पाचे नाव आणि गणेश भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. एकीकडे राज्यात संत्तासंघर्ष सुरू असताना पुण्यात गणेश विसर्जनावेळी राजकीय वैर बाजूला ठेऊन नेते एकत्र येताना दिसले.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकार पाडून भाजपसोबत सत्तास्थापना केली. त्यानंतर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यातील सत्तासंघर्षाचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात आज भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे गणेश विसर्जनावेळी एकत्र दिसले.
यावेळी झालं असं की, गणेश विसर्जनावेळी गर्दीतून रस्ता काढत आदित्य ठाकरे हे मानाचा पहिला गणपती कसबा पेठ येथे पोहोचले. येथे त्यांची सर्वजण वाट पाहत होते. यानंतर कसबा गणपतीची आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यावेळी राजकीय भेदाभेद बाजूला सारुन आदित्य ठाकरे आणि चंद्रकात पाटील यांनी पालखीला एकत्रित खांदा दिला. यावरून राजकीय वैर बाजूला ठेऊन राज्यातील दोन विरोधी नेते एकत्र येताना दिसले.