पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ आल्यापासून गेल्या काही वर्षांत संचालक मंडळाच्या मनमानी व भ्रष्ट कारभारामुळे बाजार समितीची चौकशी करण्यासाठी उच्च समिती नेमणूक करण्याची घोषणा पणनमंत्र्यांनी अधिवेशनात केली होती. बाजार समितीमधील गैरव्यवहार व गैरकारभारातून होत असलेली शेतकरी व बाजार समितीची कोट्यवधी रुपयांची आर्थिक लूट तसेच विविध भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याबाबत विविध संघटनांनी निदर्शनास आणून दिले. यावर राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावळ यांनी गुरुवारी (दि. १८) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी लवकरच चौकशी समिती नियुक्त करून कार्यवाही होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यापूर्वीच्या संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहार, गैरकारभार व भ्रष्टाचार याबाबत चौकशी होऊन बरखास्त करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. यावर कारभाराची चौकशी होऊन काही वर्षांपूर्वी मुलाणी चौकशी अहवाल शासनास सादर झालेला होता. मात्र त्यानुसार दोषींवर आजतागायत कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. तसेच आता विद्यमान संचालक मंडळानेही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार व गैरकारभाराबाबत पत्रकार परिषद घेऊन आमदार रोहित पवार यांनी चौकशीची मागणी केली होती. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. तसेच बाजार समितीच्या शेकडो तक्रारी पणन संचालक यांच्याकडे आल्याने यावर वारंवार समितीवर आरोप केले जात असल्याने गुरुवारी पणनमंत्र्यांनी पुन्हा यावर कसून चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. यावर नेमके काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावळ यांना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार व गैरकारभाराबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले आहे. यावर लवकरात-लवकर उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्तीची मागणी केली आहे. लवकरच चौकशी समिती नियुक्त करून कार्यवाही होईल, असे आश्वासन पणनमंत्र्यांनी दिले आहे. अन्यथा हजारो शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. - विकास लवांडे, प्रवक्ते, राष्ट्रवादी शरद पवार गट