Pune Crime: मस्करीचा राग आल्याने लोखंडी शस्त्राने वार करत मारून टाकण्याचा प्रयत्न
By नितीश गोवंडे | Updated: September 6, 2023 17:41 IST2023-09-06T17:40:48+5:302023-09-06T17:41:14+5:30
चेष्टामस्करीचा राग आल्याने तिघांनी त्याच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार करत मारून टाकण्याचा प्रयत्न केला...

Pune Crime: मस्करीचा राग आल्याने लोखंडी शस्त्राने वार करत मारून टाकण्याचा प्रयत्न
पुणे : गप्पा मारत उभे असताना एका २५ वर्षीय तरूणाच्या चेष्टामस्करीचा राग आल्याने तिघांनी त्याच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार करत मारून टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हनुमंत सोमनाथ शिंदे (२५, रा. संदेशनगर, मार्केटयार्ड) याने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गणेश वाघमारे (१८), योगिराज वाघमारे (४०) आणि धनराज वाघमारे (५०, रा. संदेशनगर, मार्केटयार्ड) या तिन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार भिमाले कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत आणि आरोपी गणेश वाघमारे हे मित्र असून, ते सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत बसले होते. यावेळी त्यांच्यात चेष्टा मस्करी सुरू होती. अचानक गणेशला हनुमंतने केलेल्या मस्करीचा राग आल्याने त्याने इतर दोघांना बोलवत हनुमंतला शिवीगाळ करत लोखंडी शस्त्रासह बांबूने मारहाण करण्यास सुरूवात केली.
यावेळी डोक्याला मार लागल्याने हनुमंत गंभीर जखमी झाला. योगीराज च्या हातात बांबु होता तर धनराज लाथाबुक्क्यांनी हनुमंतला मारत होता. हनुमंतवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करत आहेत.