रुग्णवाहिका चालकांना दहा महिन्यांपासून वेतनच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 09:17 IST2024-12-20T09:15:12+5:302024-12-20T09:17:24+5:30

प्रशासन दखल घेत नसल्याने मनस्ताप; कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बिकट

Ambulance drivers have not been paid for ten months | रुग्णवाहिका चालकांना दहा महिन्यांपासून वेतनच नाही

रुग्णवाहिका चालकांना दहा महिन्यांपासून वेतनच नाही

नीरा : कोरोना काळात चार ते पाच ग्रामपंचायतींचा १४ व्या वित्त आयोगाचा निधी एकत्रित करून नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक रुग्णवाहिका पुणे जिल्हा परिषदेकडून खरेदी करण्यात आली. या रुग्णवाहिकांना चालक पुरवण्यासाठी ठेका देण्यात आला आहे; पण सलग दहा महिन्यांपासून या चालकांचा पगार झाला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांवर रुग्णवाहिका सेवा पुरवणाऱ्या कंत्राटी चालकांना पुणे जिल्हा परिषदेतर्फे दहा महिन्यांपासून पगार देण्यात आला नाही. यामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची व त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग व इतर प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने चालकांना मनस्ताप झाला आहे.

रुग्णवाहिका चालवताना चालकांनी २४ तास दिलेल्या सेवेच्या तुलनेत या योजनेच्या माध्यमातून अवघे १० हजार ५०० रुपये एवढे कमी मानधन दिले जाते. हा २०२३ फेब्रुवारी-मार्च महिन्यापासूनचा पगार मिळाला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यांना इतर पीएफ, इएसआयसारख्या पुरविल्या जाणाऱ्या सेवेचेही दीड वर्षापासूनचे हप्ते थकल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, याबाबत पुरंदर तालुक्यातील नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सचिन ननावरे, वाल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रातील संदीप भुजबळ, बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रोहिदास चव्हाण, माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्रातील राजेंद्र कांबळे, परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील संदीप जाधव यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना आपली व्यथा मांडली.

दरम्यान, याबाबत ठेकेदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न असता ते फोन उचलत नाहीत तर तालुका आरोग्य अधिकारी अथवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी याबाबत संपर्क केला असता मंत्रालयातूनच निधी आला नसल्याने आम्ही आपला पगार देऊ शकत नसल्याचे सांगितले जाते. यामुळे आम्हा चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांच्या शाळेचा खर्च कुठून करायचा, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तर कर्जाचे हप्ते थकले असून ते वाढत चालले असल्याचे सांगितले.

याबाबत ठेकेदार शारदा सर्व्हिसेस या कंपनीच्या व्यवस्थापनाकडे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही, तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण नंतर बोलू असे सांगितले.

अत्यावश्यक सेवेत रुग्णवाहिकांचे चालक महत्त्वाची जबाबदारी बजावतात

पुणे जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास ९६ रुग्णवाहिका सेवा देत आहेत. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून नसबंदी शिबिरे, विविध शस्त्रक्रिया शिबिरे, नवजात शिशू लसीकरण, गर्भवती महिलांना बाळंतपणासाठी रुग्णालयात घेऊन येणे व बाळंतपणानंतर घरी सोडण्यासाठी, तसेच सर्पदंशसारख्या अत्यावश्यक सेवा पुरविताना या रुग्णवाहिकांचे चालक महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने शारदा सर्व्हिसेस या वाहन कंपनीला चालक पुरविण्याच्या ठेका दिला असून, या माध्यमातून पुरंदर तालुक्यात नीरा, वाल्हे, बेलसर, माळशिरस, परिंचे या ठिकाणी रुग्णवाहिका कार्यरत आहेत.

 

“आम्ही संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून आमची कैफियत मांडली. मात्र, तुमचे अनुदान आले नसल्याने पगार देता येत नाही, असे सांगण्यात येते. यामुळे आमच्या सर्व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. - काळुराम सस्ते, अध्यक्ष, वाहनचालक संचालक संघटना, पुणे जिल्हा. 
 

“रुग्णवाहिका चालक सांगत असलेली माहिती खरी आहे. त्यांना गेली काही महिने वेतनच मिळाले नाही. याबाबत ठेकेदार एजन्सीला विचारणा केली असता आम्हालाच मिळाले नसल्याचे सांगितले जाते, तर शासनदरबारी या खात्याअंतर्गत पैसे आले नसल्याचे सांगितले जाते. - डॉ. विक्रम काळे, तालुका आरोग्य अधिकारी, पुरंदर

 “कोविड काळात आपल्या हातून रुग्णसेवा होईल, या हेतूने या ॲम्ब्युलन्सवर काम करायला सुरुवात केली. पगार कमी असला तरी तो वेळेवर मिळेल. बारा महिने काम मिळेल यामुळे निःसंकोचपणे काम करतोय; पण मागच्या दहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. आता परिस्थिती हातघाईवर आली आहे. पोराबाळांना शाळेचे साहित्य; पण आता विकत घेता येत नाही. इतके दिवस खासगी वाहनावर काम केलं असतं तर पाच पन्नास हजार शिल्लक ठेवले असते. आता आमचा अंत न पाहता दहा महिन्यांचा पगार एकाच वेळी करावा. - सचिन ननावरे, चालक, प्राथमिक आरोग्य केंद्र, नीरा

Web Title: Ambulance drivers have not been paid for ten months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.