‘म्हाडा’च्या सोडतीला परवानगी द्या; राज्य निवडणूक आयोगाकडे ‘म्हाडा’ सभापतींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 09:56 IST2025-12-27T09:56:08+5:302025-12-27T09:56:23+5:30
पुणे : म्हाडाने काढलेल्या ४ हजार १८६ घरांसाठी सोडतीला आचारसंहितेचा अडसर निर्माण झाल्याने आता राज्य निवडणूक आयोगाकडे सोडत जाहीर करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. ‘म्हाडा’चे सभापती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही मागणी केली आहे.

‘म्हाडा’च्या सोडतीला परवानगी द्या; राज्य निवडणूक आयोगाकडे ‘म्हाडा’ सभापतींची मागणी
पुणे : म्हाडाने काढलेल्या ४ हजार १८६ घरांसाठी सोडतीला आचारसंहितेचा अडसर निर्माण झाल्याने आता राज्य निवडणूक आयोगाकडे सोडत जाहीर करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. ‘म्हाडा’चे सभापती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही मागणी केली आहे. याबाबत मुख्य सचिवांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले. यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने ११ सप्टेंबर रोजी २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ४ हजार १८६ घरांसाठी सोडत काढली आहे. या सोडतीमध्ये संपूर्ण राज्यातून नागरिकांचे एकूण २ लाख १५ हजार ९६५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांची छाननी प्रक्रिया गेल्या काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली. ही सोडत ११ डिसेंबर रोजी काढण्यात येणार होती. मात्र, अर्जांच्या विक्रमी संख्येमुळे ती काढता आली नाही.
त्यानंतर लागलीच महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने सोडत लांबणीवर पडली. ती जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सोडतीस परवानगी मिळावी, अशी मागणी म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदनही वाघमारे यांना देण्यात आले आहे. यावर वाघमारे यांनी तत्काळ राज्याच्या मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले, अशी माहिती आढळराव पाटील यांनी दिली.