धनुष्यबाण चिन्हावर लढविलेल्या सर्व जागा शिवसेनेच्याच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 09:59 IST2025-01-03T09:55:41+5:302025-01-03T09:59:39+5:30

प्रमाेद भानगिरे : महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत जागा वाटपावरून नव्या वादाला तोंड फुटणार

All the seats contested on the bow and arrow symbol will remain with Shiv Sena. | धनुष्यबाण चिन्हावर लढविलेल्या सर्व जागा शिवसेनेच्याच राहणार

धनुष्यबाण चिन्हावर लढविलेल्या सर्व जागा शिवसेनेच्याच राहणार

पुणे : महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढवलेल्या सर्व जागा शिवसेनाच लढवेल, अशी भूमिका शिंदेसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी मांडली. त्यामुळे उद्धवसेनेतून भाजपमध्ये पाच माजी नगरसेवक प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेमध्ये जागा वाटपावरून नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

पुणे शहरात प्रभागनिहाय शिवसैनिकांची बैठक आयोजित करून अनुकूल असणाऱ्या प्रभागात शिवसेनेच्या वतीने मतदारांचा सर्व्हे केला जात आहे. अन्य पक्षातील कोणतेही नगरसेवक महायुतीतील घटक पक्षात सामील झाले तरीही राज्य पातळीवर महायुतीचा ठरलेला फॉर्म्युलाच संपूर्ण राज्यात राबविल्या जाणार आहे. येत्या काळात शिवसेनेत काही नगरसेवक व विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर प्रवेश करणार आहेत. संपूर्ण राज्यात महायुती म्हणून तिन्ही पक्ष कार्यरत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते जे ठरवतील त्याचप्रमाणे पुणे शहरात येत्या महापालिकेच्या निवडणुकीला शिवसेना सामोरे जाणार आहे, असे प्रमोद भानगिरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेना पुणे शहरात ४० ते ५० जागांवर पूर्वतयारी आढावा, संघटन बांधणी आणि निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करीत आहे. शिवसेनेच्या प्रत्येक गटप्रमुखाला सक्रिय करत सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो पुणेकरांपर्यंत पोहोचण्यासाठीही शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून, निश्चितच पुणे शहरात शिवसेनेच्या माध्यमातून पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम तत्पर असू, असेही भानगिरे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुनाईत, पुणे जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे, युवा सेना शहरप्रमुख नीलेश गिरमे, शहर उपप्रमुख सुधीर कुरूमकर, संजय डोंगरे, सुनील जाधव, शहर संघटक श्रीकांत पुजारी, नवनाथ निवंगुणे, युवासेना कार्यकारिणी सदस्य कौस्तुभ कुलकर्णी, श्रुती नाझिरकर, सुरेखा पाटील, नितीन लगस, गणेश काची, नीलेश जगताप आदी उपस्थित होते.

Web Title: All the seats contested on the bow and arrow symbol will remain with Shiv Sena.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.