Maharashtra Local Body Election 2025: आळंदी नगरपरिषद निवडणूक; आत्तापर्यंत ४२.८०% मतदारांनी बजावला हक्क, प्रशासनाची चोख तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 15:11 IST2025-12-02T15:09:25+5:302025-12-02T15:11:28+5:30
दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग वाढल्याने, उर्वरित वेळेत अंतिम मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे

Maharashtra Local Body Election 2025: आळंदी नगरपरिषद निवडणूक; आत्तापर्यंत ४२.८०% मतदारांनी बजावला हक्क, प्रशासनाची चोख तयारी
आळंदी : तीर्थक्षेत्राचे शहर असलेल्या आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी आज (दि. २) शांततापूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात मतदान प्रक्रिया सुरु आहे. नगराध्यक्ष आणि २० सदस्य अशा एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होत असून, यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. निवडणुकीसाठी एकूण ३० मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. आळंदी नगरपरिषदेच्या एकूण २५ हजार ३३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये १३ हजार ५०१ पुरुष, ११ हजार ८२७ महिला आणि ०३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. नवमतदारांनीही मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला. प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे.
सकाळच्या सत्रात मतदारांचा सहभाग काहीसा संथ होता, मात्र दुपारनंतर मतदानाला चांगला वेग मिळाला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत एकूण ६ हजार २१५ मतदारांनी मतदान केले होते, ही टक्केवारी २४.५४% इतकी होती. यामध्ये २ हजार ६६३ महिला आणि ३ हजार ५५२ पुरुषांचा समावेश होता. तर दुपारी दीड पर्यंत म्हणजेच केवळ दोन तासांत मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान केले. दुपारी दीड वाजेपर्यंत एकूण मतदान १० हजार ८४१ वर पोहोचले. मतदानाची टक्केवारी लक्षणीयरीत्या वाढून ४२.८०% झाली. या वेळेपर्यंत एकूण ४ हजार ९०४ महिला आणि ५ हजार ९३६ पुरुषांनी मतदान केले. तसेच एका तृतीयपंथी मतदारानेही आपला हक्क बजावला.
दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग वाढल्याने, उर्वरित वेळेत अंतिम मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांवर अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला आहे.