पुणे : अक्षय्य तृतीयेला आंब्यांचा नैवेद्य देवाला दाखवण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा खिशाला कात्री लावणारी ठरली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचे दर २० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे. मार्केटयार्ड गुलटेकडी घाऊक फळ बाजार शनिवारी बंद असतो. मात्र (दि. १९) रविवारी अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंबा खरेदीदारांसाठी बाजार समितीकडून फळ बाजार खुला केला होता. त्यामुळे शनिवारी दि. १८ ला मार्केटयार्ड फळ बाजारात व पणन मंडळांनी सुरू केलेल्या आंबा महोत्सवाला ग्राहकांकडून आंबा खरेदीसाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
आंबा खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. यंदा तुलनेत आंब्यांचे उत्पादन कमी झाल्याने आवक घटली असल्याने आंबा महाग झाला आहे. शनिवारी मार्केटयार्डातील फळ बाजार व आंबा महोत्सवात आंब्याला १ हजार ते १८०० रूपये प्रती डझन असा भाव मिळाला. यामुळे यंदा हापूस आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले. अनेक ग्राहकांनी पूजेसाठी आंबा खरेदी केली. ग्राहकांकडून ४ डझन ऐवजी १ ते २ डझन आंबा खरेदी करून समाधान व्यक्त करावे लागले.- महागाईचा ‘हापूस’ला फटका
पुणे मार्केटयार्डात सध्या कोकण हापूसच्या मोजक्याच पेट्या दाखल होत आहेत. सणासुदीला जो आंबा ६०० ते ८०० रुपये डझन मिळणे अपेक्षित होते, तो आता थेट १२०० ते १८०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. किरकोळ बाजारात तर हा भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. ‘डझनाचा भाव ऐकूनच ग्राहक पाय मागे घेत आहेत’, अशी खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहोर गळून
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहोर गळून पडला. त्याचा थेट परिणाम आता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दिसत आहे. पुरवठा कमी असल्याने व्यापाऱ्यांना चढ्या भावाने खरेदी करावी लागत आहे आणि त्याचा फटका थेट ग्राहकांना बसत आहे. प्रथमच आतापर्यंतच्या इतिहासात अक्षय्य तृतीयेला सर्वाधिक आंब्याचा भाव गेल्याने अक्षय्य तृतीयेला आंब्यांनी भाव खाल्ला आहे.
- यंदा कोकणातील हापूस आंब्यांवर वातावरणातील बदलांचा परिणाम झाला आहे. यामुळे उत्पादन कमी झाले असून, दर वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ५० टक्क्यांनी आवक कमी झाल्याने आंब्याचे भाव वाढले असल्याने अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त मात्र ‘महागडा’ ठरला आहे. - अरविंद मोरे,आंबा व्यापारी दरवर्षी पुणे गुलटेकडी मार्केटयार्ड आंबा महोत्सवात आंबा मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात असतो. मात्र यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्याच परिमाण म्हणून बाजारात तयार मालाची आवक कमी असल्याने आंब्याचे दर हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना जादा दर असल्याने पूर्वी ४ डझन आंबा पेटी घेणारे ग्राहक केवळ १ ते २ डझन घेऊन जात आहेत. - गणेश शिशेकर संगमेश्वर रत्नागिरी शेतकरी.
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने पूजेसाठी सकाळी मार्केटयार्ड येथे आंबा खरेदीसाठी केले असता आंबा महाग होता. मार्गीलवर्षी ५०० ते ६०० रूपये खरेदी केला होता. यंदा मात्र दुप्पट भावाने खरेदी करावी लागली. तरी ही त्यामध्ये कच्चा मालाचे प्रमाण जास्त होते. यंदा मात्र आंबा खाणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. - सारिका अष्टूळ गृहिणी
Web Summary : Pune's mango market saw high prices this Akshaya Tritiya due to reduced supply. Unseasonal rains damaged crops, pushing prices up to ₹1800 per dozen, impacting buyers' purchasing power.
Web Summary : पुणे के बाजार में अक्षय तृतीया पर आमों की कीमतें बढ़ीं क्योंकि आपूर्ति कम थी। बेमौसम बारिश से फसल को नुकसान हुआ, जिससे कीमतें ₹1800 प्रति दर्जन तक पहुंच गईं, जिसका असर खरीदारों पर पड़ा।