दिल्लीतील राजकारणात मराठी माणूस मागेच - पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 17:24 IST2025-02-23T17:21:01+5:302025-02-23T17:24:22+5:30
मी राजकीय कुटुंबातून आलो असलो तरी घरातील शिक्षणाचे संस्कार माझ्यात रुजले होते.

दिल्लीतील राजकारणात मराठी माणूस मागेच - पृथ्वीराज चव्हाण
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या विषयावर मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक मुद्दयांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले,'मराठी माणसाकडे महत्वाकांक्षेची कमतरता असल्यामुळे तसेच तो अल्पसंतुष्टही असल्यामुळे केंद्रीय राजकारणात मराठी आवाज घुमला नाही.' असं मत त्यांनी मांडलं
ते पुढे म्हणाले,'मी राजकीय कुटुंबातून आलो असलो तरी घरातील शिक्षणाचे संस्कार माझ्यात रुजले होते. त्यामुळेच उच्च शिक्षण पूर्ण केल्याशिवाय मी राजकारणाकडे वळलो नाही. माझे प्राथमिक शिक्षण कराडच्या नगरपालिकेच्या शाळेत झाले. पुढे वडिल खासदार झाल्यामुळे आमचे वास्तव्य दिल्लीतच राहिले. तेथे पहाडगंज येथील नूतन मराठी विद्यालयाच्या शाळेत मला आठवी ऐवजी सातवीत प्रवेश मिळाला, कारण दोन्हीकडील शिक्षणामध्ये खूप तफावत होती. तेव्हापासूनच योग्यतेपेक्षा एक पायरी खाली संधी मिळणे नशिबी आले.
दिल्लीतील राजकारणी इरसाल असतात. त्यांच्याबरोबर व्यवहार करताना मराठी माणसाचे वेगळेपण महत्त्वाचे ठरते. परंतु मराठी माणसाकडे महत्वाकांक्षेची कमतरता असल्यामुळे तसेच तो अल्पसंतुष्टही असल्यामुळे केंद्रीय राजकारणात मराठी आवाज घुमला नाही.'
'या उलट उत्तरेकडे सगळे राजकीय नेते दिल्लीत राहतात आणि केंद्रीय राजकारणच करतात. भाषेचा न्यूनगंड, दिल्लीतील हवामान, खाणे-पिणे या विषयांचा बाऊ करून मराठी माणूस दिल्लीतील राजकारणात मागेच पडला आहे. आज महाराष्ट्राच्या जनतेनेी मराठी नेत्यांना साथ देऊन केंद्रीय राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. येथे संगीत खुर्चीचा खेळ होऊ देता कामा नये.
आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी मी केंद्रात मंत्री असताना याची प्रक्रिया सुरू झाली होती. पुढे महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना भाषेविषयी समिती स्थापन करून त्याचा अहवाल माझ्यामार्फतच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला पाठविला गेला. पुढे साहित्य अकादमीकडून हा अहवाल तपासला गेला. या संपूर्ण प्रक्रियेला मोठा कालखंड लागला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषा संवर्धन आणि विकासासाठी आर्थिक तरतूद झाली आहे.'